Join us  

“सचिन वाझे काही लादेन आहे का?”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भूमिकेवरुन भाजपची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 1:17 PM

प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे दोघेही शिवसेनेमध्ये होते. सामान्य पोलिसांकडे ४५ लाख आले कुठून, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे, असे भाजपने म्हटले आहे.

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके असलेले वाहन उभे करून दहशत निर्माण करणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची हत्या करणे या कटात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माचा (Pradip Sharma) सक्रिय सहभाग होता; तसेच मनसुख हत्याकांडाच्या कटाचा प्रदीप शर्मा हाच मुख्य सूत्रधार होता. पूर्वी निलंबित असलेला पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हा पुन्हा पोलिस सेवेत आला होता. त्यामुळे या संपूर्ण कटाच्या अनेक बैठका मुंबई पोलिस आयुक्तालय इमारतीच्या आवारात झाल्या आणि त्या बैठकांना शर्माही उपस्थित राहिला. मनसुखची हत्या करणाऱ्या गुंडांना पैसे देण्यासाठी वाझेने शर्माकडे ४५ लाख रुपये दिले, असे एनआयएने स्पष्ट केले असून, यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावरून भाजपने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात बोलताना सचिन वाझे लादेन आहे का, अशी विचारणा करत पाठराखण केली होती. हाच धागा पकडत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एकामागून एक ट्विट करत केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी शिवसेनेवरही हल्लाबोल केला आहे. 

सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हे शिवसेनेमध्ये होते

सचिन वाझे काही लादेन आहे का? असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिले पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. 

कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हे समोर आले पाहिजे

राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यात हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी या माध्यमातून केली आहे. 

पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का?

बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.  

टॅग्स :उद्धव ठाकरेसचिन वाझेप्रदीप शर्मामनसुख हिरणभाजपा