कांदिवलीतील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 05:43 IST2025-05-26T05:43:46+5:302025-05-26T05:43:46+5:30

मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत

BJP internal dispute in Kandivali is on the rise | कांदिवलीतील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

कांदिवलीतील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

मुंबई :मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला असून स्थानिक नेते देवांग दवे यांनी भाजपचे आ. प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध उघडपणे दंड थोपटले आहेत.

कांदिवली, ठाकूर व्हिलेज येथील भाजपचे पदाधिकारी देवांग दवे यांनी समतानगर पोलिस ठाण्यात आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. बेकायदा फेरीवाले, तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याने आपल्याला त्रास दिला जात आहे, असे देवांग दवे यांनी म्हटले आहे. पालिका निवडणुकीत दरेकर यांना स्वत:च्या उमेदवाराला उभे करायचे असल्याने ते त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.

२२ मे रोजी एव्हरशाईन क्लबजवळील कार्यक्रमात असताना एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आपल्या मागावर होती. त्याला हटकले असता त्याने तेथून पळ काढला, असे सांगत दवे यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. बेकायदा कृत्याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि धक्कादायक म्हणजे यामागे आमचाच भाजप नेता आहे, अशा आशयाची पोस्ट त्यांनी समाजमाध्यमावर शेअर केली आहे.

‘लोकमत’शी बोलताना दवे यांनी हा भाजप नेता म्हणजे आमदार प्रवीण दरेकर असून त्यांची तक्रार आपण पक्षात सर्व पातळ्यांवर केल्याचे स्पष्ट केले. याबाबत दरेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर ‘बाहेर चर्चा करणे मला अपेक्षित नाही. हा विषय पक्षांतर्गत असल्याने पक्षाच्या पातळीवर सोडवू,’ अशी प्रतिक्रिया मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
 

Web Title: BJP internal dispute in Kandivali is on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.