Join us

भाजपचे हिंदुत्व हेच 'फेक नरेटिव्ह'; उद्धव ठाकरे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 06:18 IST

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात रविवारी पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा निर्धार मेळावा झाला

मुंबई : भाजप देशप्रेमी आहे, हिंदुत्ववादी आहे, हेच एक 'फेक नॅरेटिव्ह' आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानणारे काहीजण भारत- पाकिस्तान मॅच पाहायला गेले होते. त्या वेळचे त्यांचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर टाकले आहेत. अनुराग ठाकूर हे पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसले आहेत. अमित शहांचे चिरंजीव जय शहा हेसुद्धा तेथे हजर होते. याच जय शहांच्या जागी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असते तर भाजपने थयथयाट केला असता, असा टोला उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी लगावला.

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात रविवारी पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा निर्धार मेळावा झाला. यावेळी खा. संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, सुषमा स्वराज तेव्हा म्हणायच्या की जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाशी सरळ वागत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तानशी कोणतेही मग अगदी खेळाचेही संबंध ठेवणार नाही. पण आता पाकिस्तान, बांगलादेश अशा सगळ्या मॅच चालतात. बांगलादेशात हिंदूंचा छळ होतोय, आता तर तेथील बातम्या येणेही बंद झाले आहे. त्याच बांगलादेशबरोबर आपण क्रिकेटची मॅच खेळायची, पाकिस्तानशी खेळायची आणि आपल्याला हे हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार? ही लढाई पक्षाची लढाई नाही. ही लढाई राजकीय लढाई नाही. ही आपल्या मातृभाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, असेही ठाकरे म्हणाले.

सत्ताधाऱ्यांना मुंबई एका उद्योगपतीच्या घशात घालायची आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

करून दाखवले... 

विकासकामांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्याला ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, २०१२ साली आपण फक्त दोन शब्दांवर मुंबई जिंकली होती, 'करून दाखवले', २०१७ला पण तेच केले. फडणवीस यांना सांगा कोस्टल रोड हे कर्तृत्व तुमचे नाही, माझ्या शिवसेनेचे आहे. त्याचे भूमिपूजन मी केले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपा