Join us
Daily Top 2Weekly Top 5

'...मग त्यांचे पण शुद्धीकरण केले जाणार का?'; भाजपाचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 15:36 IST

शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजपाने निशाणा साधला आहे.

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत जन आशीर्वाद यात्रा पार पडली. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन नारायण राणे यांनी अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय वाद रंगला आहे. 

शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजपाने निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले म्हणून त्या जागेचे शुद्धीकरण केले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार अबू आझमीशी हातमिळवणी करून आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसमोर नतमस्तक होऊन बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. मग त्यांचे पण शुद्धीकरण केले जाणार का?, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.

तत्पूर्वी, नारायण राणे यांनी हे शुद्धीकरण करणं उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील हे शुद्धीकरण करणं हे सर्वोत्तम काम आहे. ते दुसरं काहीही करू शकत नाहीत," अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे - राणे

माझ्याकडे केंद्रातील जे खाते आहे त्याचा उपयोग करून मी महाराष्ट्रात उद्योग, व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला यात साथ दिली पाहिजे. करून दाखवायची माझ्यामध्ये धमक आहे. कोकणात किती विकास केला आहे बघा, असेही राणे यावेळी म्हणाले.

३२ वर्षांचा पापाचा घडा भरणार

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक भाजपच जिंकणार. शिवसेनेच्या ३२ वर्षांचा पापाचा घडा भरणार आहे. मुंबई महापालिका जिंकणे, हीच माझी जबाबदारी आहे. फडणवीस, दरेकर अशा सगळ्यांवरच ही जबाबदारी आहे. पण, मुंबई महापालिका आम्ही जिंकणारच आणि त्यासाठी मी मुंबईभर फिरणार असल्याचेही राणे यांनी जाहीर केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपाशिवसेना