मुंबईत भाजपला १३७ तर शिंदेसेनेला ९० जागा; ९३ उमेदवारांना एबी फॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:20 IST2025-12-30T10:19:44+5:302025-12-30T10:20:43+5:30
आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला शिंदेसेना जागा देतील, असे रात्री उशिरा झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले.

मुंबईत भाजपला १३७ तर शिंदेसेनेला ९० जागा; ९३ उमेदवारांना एबी फॉर्म
मुंबई : भाजप आणि शिंदेसेनेच्या महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सोमवारी रात्री ठरला. मुंबईतील २२७ प्रभागांपैकी भाजप १३७ आणि शिंदेसेना ९० जागा लढविणार आहेत. रिपाइंला (आठवले गट) भाजपच्या कोट्यातील जागा सोडण्यात येतील. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला शिंदेसेना जागा देतील, असे रात्री उशिरा झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम आणि शिंदेसेनेचे प्रभारी सरचिटणीस व माजी खा. राहुल शेवाळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, असे साटम म्हणाले. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी अधिकृत यादी जाहीर न करता उमेदवारांना वैयक्तिकरीत्या संपर्क साधून अधिकृत उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) देण्याचा निर्णय महायुतीतील दोन्ही पक्षांनी घेतला आहे.
भाजपच्या ६६ उमेदवारांची एक यादी सोमवारी समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र, भाजपकडून ही यादी अधिकृत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पण या यादीतील बहुतांश नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
यादीत नेत्यांचे नातेवाईक
यादीत काही भाजप नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश असून काही अन्य पक्षातून प्रवेश केलेल्या नेत्यांनाही स्थान दिले आहे. विशेष म्हणजे, सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दुपारी त्यांची उमेदवारी घोषित झाली. काँग्रेसमधून आलेले रवी राजा, चंदन शर्मा, मनसे-उद्धवसेना असा प्रवास करणाऱ्या अर्चना भालेराव, उद्धवसेनेतून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचाही या यादीत समावेश आहे.
९३ उमेदवारांना एबी फॉर्म
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ येऊनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. काही प्रभागांमध्ये अद्याप तडजोडीच्या चर्चा सुरू असून, अंतिम निर्णयासाठी नेत्यांमध्ये खल सुरू असल्याची माहिती आहे.
कोणती जागा भाजप लढवणार आणि कोणती शिंदेसेना लढवणार याबाबत प्राथमिक निर्णय झाले असले, तरी संभाव्य नाराजी टाळण्यासाठी या निर्णयांवर गुप्तता पाळली जात आहे. भाजपकडून रविवारी रात्री उशिरा मुंबई भाजप कार्यालयात निवडक उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यावेळी ९३ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले.