Join us  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंचे प्रेम बेगडी; भाजपाकडून मुख्यमंत्र्यांवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 8:18 AM

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 1978 साली चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास गेले होते

मुंबई - मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास गेले नाहीत तसेच महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीसाठी त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून स्वतः बैठकही घेतली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यास उद्धव ठाकरे यांना वेळ नाही व त्यांचे बाबासाहेबांविषयीचे प्रेम बेगडी आहे अशी टीका भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी केली आहे. आता किमान महापरिनिर्वाणदिनाला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास जातील, अशी आपल्याला आशा आहे असंही त्यांनी सांगितले. 

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाई गिरकर म्हणाले की, महापरिनिर्वाणदिनी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देश विदेशातून लाखो लोक येतात. त्यांच्या व्यवस्थेसाठी गेली पाच वर्षे स्वतः तत्कालीन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस बैठक आयोजित करत होते. देवेंद्र फडणवीस महापरिनिर्वाणदिनाला सकाळीच अभिवादन करण्यास उपस्थित राहत. त्यांच्या पुढाकाराने राज्यपालांनी त्यांच्यासोबत महापरिनिर्वाणदिनी अभिवादनाला येण्याची परंपरा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीसाठी मंगळवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीला केवळ मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. आपण स्वतः या बैठकीस उपस्थित होतो. मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री बैठकीस उपस्थित राहतील, असे आपल्याला सांगण्यात आले होते असा आरोप त्यांनी केला. 

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 1978 साली चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास गेले होते व त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील कोणीही चैत्यभूमीवर अभिवादनास गेलेले नाही. किमान राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर तरी उद्धव ठाकरे चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना मानवंदना देण्यास जातील, अशी अपेक्षा होती पण त्यांना त्यासाठी वेळ मिळालेला नाही. चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाणदिनाला लाखोंचा समुदाय जमा होतो. त्यांच्या व्यवस्थेसाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची गेल्या पाच वर्षांची परंपरा आहे. पण उद्धव ठाकरे मात्र बैठकीस गैरहजर राहिले असं भाई गिरकर यांनी सांगितले. 

दरम्यान, मुंबईत आल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बहुतेक मंत्र्यांना मात्र शपथविधीनंतर त्यासाठी वेळ मिळालेला नाही, याची खंत वाटते असल्याचं आमदार भाई गिरकर यांनी सांगितले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपामुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस