मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 08:06 IST2025-11-02T08:05:41+5:302025-11-02T08:06:21+5:30
भाजपचे नेते, कार्यकर्ते यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मविआचा निषेध केला.

मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत पराभव स्पष्ट दिसत असल्याने आता मतदार याद्यांबाबत संशय घेणारा फेक नरेटिव्ह महाविकास आघाडी पसरवत असून हा त्यांचा नवा राजकीय कट असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. मविआ आणि मनसेच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने गिरगाव चौपाटी येथे मूक आंदोलन करण्यात आले. भाजपचे नेते, कार्यकर्ते यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मविआचा निषेध केला.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, मविआ करत असलेल्या दाव्यांची पोलखोल केली जाईल. नागरिकांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी महायुती सरकार झोकून काम करत असताना महाविकास आघाडी राज्यात अराजक माजवून पिछाडीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. परदेशी शक्ती आणि फंडिंगच्या मदतीने पोसणाऱ्या सामाजिक संस्थांना हाताशी घेऊन विकास रोखण्याचे आणि दिशाभूल करून अस्थिरता निर्माण करण्याचे काम ही मंडळी करत आहेत.
लोढांचे खुले आव्हान
अस्लम शेख, अमिन पटेल आणि अबू आझमी या तिघांच्या मतदारसंघात किमान पाच हजार बांगलादेशी-रोहिंग्या आहेत. जर हे खोटे निघाले तर मी राजीनामा देईन, सापडले तर या तिघांनी राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. याबाबत सोमवारी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असे ते म्हणाले.
...हा असत्याचा तमाशा
आ. अमित साटम म्हणाले, मतदार आपल्याला का नाकारत आहेत याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी मविआ नेत्यांनी मोर्चाच्या माध्यमातून असत्याचा तमाशा लावला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचे गलिच्छ राजकारण आघाडीकडून खेळले जात आहे.
शरद पवारांची गैरसोय, खा. सुळे यांचा संताप
मोर्चादरम्यान स्टेजवर पोहोचण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गैरसोय झाल्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर झाला होता. पवार यांची गाडी स्टेजजवळ न पोहोचल्याने त्यांना डिव्हायडर ओलांडावे लागले. त्यामुळे पवार यांच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची सुळे यांनी झाडाझडती घेतली. पोलिसांशी चर्चा करून त्यांनी गाडी स्टेजपर्यंत बोलावली. मात्र, तोपर्यंत पवार स्टेजवर पोहोचले होते.
आयोग भाजप कार्यालय आहे का?: शर्मिला ठाकरे
मोर्चामध्ये सामील झालेल्या राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांनी, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत असताना त्याचे उत्तर भाजप देत आहे. निवडणूक आयोग हे भाजपचे कार्यालय आहे का? असा सवाल केला. तर, भाजपने मूक आंदोलनच करावे, बडबड कशाला करताय? असा टोलाही त्यांनी भाजपच्या मूक आंदोलनावर लगावला. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे व त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्यासह शर्मिला यांनी मोर्चात सहभाग घेतला.
दुपारची वेळ असल्याने अनेक मोर्चेकऱ्यांनी मोर्चा निघण्यापूर्वी गटागटाने पोटपूजा केली. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. मोर्चामुळे फॅशन स्ट्रीट येथील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. तर या रस्त्यावर एकतर्फी वाहतूक सुरू होती. अशातच, एका रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देत मोर्चेकऱ्यांनी माणुसकी जपली.