Join us

“हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना विचारा, तुमच्यासारखे ५६ परब पाहिले”; चित्रा वाघ संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:16 IST

BJP Chitra Wagh Vidhan Parishad News: आम्ही इथे वशिल्याने आलेलो नाही. सोयीप्रमाणे आपले तोंड गप्प करायचे आणि महिलांवर दादागिरी करायची, मी माझी लढाई लढले आणि यापुढेही लढणार, असा एल्गार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत केला.

BJP Chitra Wagh Vidhan Parishad News: दिशा सालियान प्रकरणावर अनेकांनी मुद्दे मांडले. तिच्या वडिलांनी रिट पिटिशन दाखल करून काही मुद्दे उपस्थित केले आहेत. मी काय म्हटले की, एसआयटी स्थापन झाली आहे, त्याचा रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. जे खरे आहे, ते जनतेसमोर आले पाहिजे. दूध का दूध आणि पानी का पानी व्हायला पाहिजे. यावर संजय राठोड यांचा विषय घेण्यात आला. संजय राठोड यांच्या विषयावर चित्रा वाघ यांनी काय केले होते, असे मुद्दे मांडण्यात आले. मी केले मला जे करायचे होते ते. जे मला दिसले, जे पुरावे आले, त्या आधारावर लढले. तुम्ही तोंड शिवून बसला होतात का, तुम्ही शेपूट घातलेत, असे सांगत चित्रा वाघ यांनी विधान परिषदेतअनिल परब यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.

विधान परिषदेत ठाकरे गटाचे अनिल परब यांनी दिशा सालियान प्रकरणावर बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी, त्यांनी आमदार चित्रा वाघ यांचे नाव घेतले. महायुतीमधील मंत्री संजय राठोड, जयकुमार गोरे यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही, त्यांचा राजीनामा घ्या, विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसेही दाबू नका, असे म्हणत अनिल परब यांनी सरकारवर निशाणा साधला. चित्रा वाघ यांच्यावरही टीका केली. या टीकेचा चित्रा वाघ यांनी विधान परिषदेतच लगेच तीव्र शब्दांत समाचार घेतला. यावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. 

सोयीप्रमाणे आपले तोंड गप्प करायचे आणि महिलांवर दादागिरी करायची

हे मंत्रिमंडळात कसे आले, हे आम्हाला विचारता. अनिल परब तुमच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा की क्लिन चीट कशी दिली. त्यांनी क्लिन चीट दिली. अनिल परब फार मोठे हुशार आहेत, फार मोठे विधिज्ञ आहेत, हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून आल्यापासून ऐकते. त्यांची हुशारी मी कधी बाहेर पाहिली नाही. इथे काही हुशारी करत असतील. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की, आज संजय राठोड मंत्रिमंडळात का आहेत, याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सर्व मीडियासमोर दिले. अनिल परब तु्म्ही ते ऐकले नाही का, मग तेव्हा यावर का बोलला नाहीत. सोयीप्रमाणे आपले तोंड गप्प करायचे आणि महिलांवर दादागिरी करायची, मी माझी लढाई लढले आणि यापुढेही लढणार, असा एल्गार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत केला. 

दरम्यान, माझे नाव घेऊन बोलण्यात आले. म्हणून मी त्यांना उत्तर देते. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित. पण माझी भूमिका ठाम आहे, मी दोन वर्ष सहन केले आहे. माझ्या परिवाराने सहन केले आहे, ते पाहायला तुम्ही आला नव्हता. एखाद्या विषयासाठी एखादी बाई लढते, तेव्हा पाय खेचायला १०० लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. तुम्हालाच उत्तर देते, तुम्हाला घाबरत नाही. तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. तुम्हालाच सांगते. आम्ही इथे वशिल्याने आलेलो नाही. तुम्हाला बाकी काही मिळाले नाही की, आमच्या घरा-दारावर येता. आम्ही लढाई लढलो आणि जिंकलो, असे चित्रा वाघ यांनी ठामपणे सांगितले.

 

टॅग्स :विधान परिषदचित्रा वाघअनिल परब