Join us

"सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम"; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:37 IST

BJP Chitra Wagh And Sanjay Raut : शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र आता सुरुवातीच्या कलांमध्ये शिवसेना उमेदवारांना यश आलेलं नाही. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने धमाका केला असून २६९ जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का बसला आणि आपने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये उमेदवार उभे केले होते. उत्तर प्रदेशमध्ये २२ ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार उभे केले होते. मात्र आता सुरुवातीच्या कलांमध्ये शिवसेना उमेदवारांना यश आलेलं नाही. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी निवडणुकीच्या निकालांवरून थेट शिवसेना आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. "सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे. झुकेगा नहीं.. जबतक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ नहीं करता – इति सर्वज्ञानी" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी संजय राऊतांना देखील टॅग केलं आहे.

"यह तो सिर्फ अंगडाई है, अब महाराष्ट्र कि बारी है…. जय हो" 

"अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को.. फिर एक बार करारा जवाब… यह तो सिर्फ अंगडाई है….अब महाराष्ट्र कि बारी है…. जय हो…..विजय हो…" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.  गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजप १८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसचे उमेदवार १२ मतदारसंघात पुढे आहेत. या निवडणुकीत नशीब आजमवणाऱ्या शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी गोव्याचा दौरा केला होता. 

गोव्यात जिथे आदित्य ठाकरे प्रचाराला गेले, तिथे शिवसेनेचे काय झाले; पाहा धक्कादायक आकडेवारी 

आदित्य यांनी चार मतदारसंघात शिवसेनेचा प्रचार केला. या चारही मतदारसंघात शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे. विशेष म्हणजे या चारही उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला दुपारी १ पर्यंत अडीचशे मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. आदित्य ठाकरे साखळी, वास्को, पेडणे, म्हापसा मतदारसंघात प्रचाराला गेले होते. आदित्य यांनी प्रचारसभा घेतल्या, भाषणं केली. काही ठिकाणी डोअर टू डोअर प्रचार केला. मात्र तरीही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार झाला. विशेष म्हणजे या ठाकरेंनी प्रचार केलेल्या चारही मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

टॅग्स :चित्रा वाघसंजय राऊतभाजपाशिवसेनाराजकारण