Join us  

Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 1:06 PM

BJP Ashish Shelar And Uddhav Thackeray : भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी नालेसफाईची पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.

मुंबई - पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबईभाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. "उद्धव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?" असा सवाल अँड. शेलार यांनी केला.

मुंबईतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवसापासून आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम त्यांनी गजधरबांध परिसरातील नाल्याची पाहणी केली. तर काल पश्चिम उपनगरातील अंधेरी, वर्सोवा या नाल्यांची पाहणी केल्यानंतर आज त्यांनी वळणई नाला लिंक रोड मालाड  (पश्चिम ), अवधूत नगर नाला दहिसर (पूर्व )  एन.एल कॉम्प्लेक्स जवळील नाला व दहिसर नदीची पाहणी केली.

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,  आम्ही नालेसफाईच्या कामाची पाहणी करतोय. जी आकडेवारी पालिका सांगतेय आणि प्रत्यक्ष चित्र यामध्ये तफावत आहे. 95 % सफाईचा दावा वडनई नाल्याचा केला जातोय, पण प्रत्यक्षात अद्याप गाळ नाल्यातून काढण्यात येतो आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली त्याचे स्वागत करीत आशिष शेलार म्हणाले की, शिंदे हे जबाबदार मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईकरांची काळजी केली. यापुर्वी उद्धव ठाकरे यांच्या रूपाने बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिले. ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत होते.

मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उद्धव ठाकरे कुठे आहेत? इथे नाल्यावर मर्दूमकी का दाखवत नाहीत, ते लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत का? असा खोचक सवालही आमदार आशिष शेलार यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे स्थानिक आमदार, नगरसेवक, उत्तर मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, भाजपा पदाधिकारी आणि पालिका अधिकारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :आशीष शेलारभाजपाउद्धव ठाकरेमुंबई