Join us

“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:07 IST

Mumbai Municipal Corporation Election: देवेंद्र एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, हे उद्धव ठाकरेंचे वाक्य भाजपा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे. उद्धव ठाकरे तुम्ही कुठे असाल, हे मुंबईकर या निवडणुकीत दाखवतील, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे.

Mumbai Municipal Corporation Election: मुंबईसह राज्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. एकीकडे महापालिका निवडणुका महायुतीत लढल्या जाणार असल्याचे म्हटले जात असले तरी ठाकरे गटाला मुंबई पालिकेच्या निवडणुकीतून हद्दपार करण्याचा चंग भाजपाने बांधलेला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे निम्मे माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. यातच आता मुंबईकर उद्धव ठाकरे यांना ते कुठे आहेत, ते दाखवतील, महाविकास आघाडीच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ५० जागाही येणार नाहीत, असा मोठा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे. 

आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचे भान सुटलेला नेता बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरे गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले होते की, देवेंद्र एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन. विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवले आहे की, भाजपा आणि देवेंद्रजी कुठे आहेत. उद्धव ठाकरे कुठे राहिले? एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, हे उद्धव ठाकरेंचे वाक्य भाजपा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे. मुंबईकर या निवडणुकीत दाखवतील उद्धवजी तुम्ही कुठे असाल? असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. 

मुंबई महापालिका निवडणूक महायुतीत लढणार आणि जिंकणारही

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणूक महायुतीत आम्ही लढणार आहोत आणि जिंकणारही आहोत. ५० पेक्षा कमी जागा महाविकास आघाडीला मुंबई महापालिका निवडणुकीत मिळतील, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईकरांचा सेवेकरी कोण? याच मुद्द्यावर मुंबई महापालिका निवडणूक होणार आणि महायुती जिंकणार, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, मतदारांचा मतदानापुरता विचार करणे हे भाजपचे धोरण नाही. मी मुंबईभर फिरतोय आणि ज्या प्रकारे मला दिसतंय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईकडे पाठ दाखवली आहे. रोज बडबड करणाऱ्या उबाठा नेत्यांना मुंबईशी काही घेणेदेणे नाही. ते नाल्यांवर रस्त्यांवर कुठेही दिसत नाही. ते फक्त टीव्हीवर दिसतात. टीव्हीवर दिसून मते मिळतात हा गैरसमज आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. 

 

टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२५आशीष शेलारशिवसेनाउद्धव ठाकरे