Join us  

मुंबईला ओरबाडून 'आत्मनिर्भर गुजरात', ममतांच्या मुंबई भेटीवरुन शिवसेनेनं दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 10:01 AM

मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देभाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी या भेटीवरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार यांच्या पश्चिम बंगालवरील टीकेला संजय राऊत यांनी व्हायब्रंट गुजरातने उत्तर दिलंय.  

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्या. सर्वप्रथम त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना 'जय मराठा, जय बांगला' असा नारा देत सर्वांना आश्चर्यचकीत केले. हा नवा नारा भाजपविरोधी राष्ट्रीय राजकारणातील आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे, ममता यांच्या मुंबई भेटीवरुन भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली. भाजपच्या या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान आता भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी या भेटीवरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार यांच्या पश्चिम बंगालवरील टीकेला संजय राऊत यांनी व्हायब्रंट गुजरातने उत्तर दिलंय.  ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला आहे. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात असा सूर काही नेत्यांनी आवळलाय. मात्र, आज Vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री अर्धे मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय, याची आठवण खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी करून दिलीय. तसेच, मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात, असे म्हणत मुंबईच्या उद्योजकांवर गुजरात उभारत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. 

काय म्हणाले होते आशिष शेलार 

"महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटन मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?, सरकार या भेटीतील चर्चा का लपवते?" असा सवाल शेलार यांनी केला आहे. तसेच "विरोधकांना चिरडणाऱ्या "बंगाली हिंसेचे" धडे तर गिरवले जात नाही ना?" असं म्हणतं निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "ममता दीदी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय... पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण... महाराष्ट्रातील उद्योगांना, दीदी पश्चिम बंगालमधे या असे आमंत्रण घेऊन ही त्या आल्या आहेत का?" असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

इथल्या तरुणाने फक्त वडापाव विकायचा का?

"म्हणजे इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मदत करतेय का? इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का? नुकतीच बांग्लादेशीयांवर कारवाई झाली, यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी इथले सरकारी पक्ष दिदींना देत तर नाहीना?" असं म्हणत आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "विरोधकांना चिरडणाऱ्या "बंगाली हिंसेचे" धडे तर गिरवले जात नाही ना? महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटन मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी सरकार या भेटीतील चर्चा का लपवते?" असंही शेलार यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :मुंबईसंजय राऊतशिवसेनाभाजपाआशीष शेलार