Join us
Daily Top 2Weekly Top 5

Anil Bonde : "उद्धव ठाकरेंच्या लंकेला हनुमंताच्या शेपटीने आग लागली, राणांनी अख्खी शिवसेना कामाला लावली" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:02 IST

BJP Anil Bonde : भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई - मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी केली असून ते राणा दाम्पत्यांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. याच दरम्यान भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे (BJP Anil Bonde) यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरे यांच्या लंकेला महाबली हनुमंताच्या शेपटीने आग लागली" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "राणा दाम्पत्यांनी अख्खी शिवसेना कामाला लावली उगीचच धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्याचा शिवसेना प्रयत्न करत आहे. त्याची फळे त्यांनी भोगावी लागतील" असंही म्हटलं आहे. 

डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "राणा दाम्पत्यांनी अख्खी शिवसेना कामाला लावली. खरं पाहता शिवसेनाच हे प्रकरण वाढवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रवी राणा हे सर्व हिंदू आहेत. मग सगळ्यांनी मिळून हनुमान चालीसा वाचण्याचा मातोश्रीवर महोत्सव करायला काय हरकत आहे" असं बोंडे यांनी म्हटलं आहे. "उगीचच धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्याचा शिवसेना प्रयत्न करत आहे. त्याची फळे त्यांना भोगावी लागतील" असंही ते म्हणाले.

"राणा दाम्पत्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत करायला हवे. कारण ते हिंदू धर्मात जागृती निर्माण करण्याचे काम करत आहेत. हनुमान चालीसाचा प्रचार करण्याचे काम जर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले असते तर संपूर्ण भारतात त्याचा मेसेज गेला असता" असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. शिवसैनिक आक्रमक झालेले असतानाच राणा दाम्पत्य यांनी फेसबुक लाईव्ह केलं आहे. यामध्ये सुरुवातीला राणा दाम्पत्य पूजा करताना दिसत होते. त्यानंतर रवी राणा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच "'मातोश्री' हे आमच्यासाठीही देऊळ आहे. आम्ही देखील मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचण्यासाठी निघालोय. पण आम्हाला थांबवलं आणि गुंडागर्दी करून आमच्या घरावर हल्ला होत आहे. पोलिसांना हाताशी धरून मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत" असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. 

"'मातोश्री' आमच्यासाठीही देऊळ; पोलिसांना हाताशी धरून मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्था बिघडवताहेत!"

"आम्हाला दरवाजामध्ये रोखलेलं आहे. हनुमानाचं नाव घेण्यापासून आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आम्ही इथून बाहेर पडणार आहोत आणि याची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील. मातोश्रीवर कार्यकर्त्यांना बोलावून आमच्या घरावर हल्ला करायचा, आम्हाला रोखायचं, आम्हाला मारायचं, गाड्यांची तोडफोड करायची असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र कुठे चाललाय हे महाराष्ट्राची जनता पाहतेय" असं म्हणत रवी राणा यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनी आजच्या दिवशी संपवायचा आहे. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरू आहे. आमच्या घरावर हल्ला होतो आहे, तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच असे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले. हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये असे आवाहन रवी राणा यांनी केले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाअनिल बोंडेरवी राणा