बनावट युआरएल वापरत बनवला जन्मदाखला; कांदिवलीत पासपोर्ट अर्जदारावर गुन्हा
By गौरी टेंबकर | Updated: October 18, 2023 16:35 IST2023-10-18T16:34:54+5:302023-10-18T16:35:51+5:30
पासपोर्ट देणाऱ्या संबंधित विभागाने विशेष शाखा २ ला खानच्या कागदपत्रांची पडताळणी पुन्हा करण्यास सांगत ती परत पाठवली.

बनावट युआरएल वापरत बनवला जन्मदाखला; कांदिवलीत पासपोर्ट अर्जदारावर गुन्हा
मुंबई: कांदिवली पोलिसांनी नायब साजिद खान नामक भामट्या पासपोर्ट अर्जदारासह त्याच्या साथीदारांच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला. खानने त्याचा जन्म दाखला बनविण्यासाठी युआरएलमध्ये स्लॅश एवजी डॉट असलेल्या अनधिकृत वेबसाईटचा वापर केल्याचे उघड झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पासपोर्ट देणाऱ्या संबंधित विभागाने विशेष शाखा २ ला खानच्या कागदपत्रांची पडताळणी पुन्हा करण्यास सांगत ती परत पाठवली. दरम्यान मध्यंतरी विशेष शाखेच्या एका कार्यशाळेने अंमलदारांना दिलेल्या माहितीनुसार, स्लॅशऐवजी डॉट असलेल्या अनधिकृत साईटवरून असे बोगस जन्म दाखले बनविण्यात येतात.
हा प्रकार विशेषत: उत्तर प्रदेश व बिहार ठिकाणाहून येणाऱ्या जन्म प्रमाणपत्रात आढळत असल्याने तिथून येणाऱ्या कागदपत्रांची नीट काटेकोरपणे सत्यता पडताळणी करण्याचे निर्देश वरिष्ठानी दिले आहेत. त्यानुसार संदीप म्हात्रे या कांदिवली पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागात कार्यरत असलेल्या शिपायाने या विरोधात तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहितेंव्हा संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.