Bird Flu: धक्कादायक! अमरावतीत अचानक २८ कोंबड्या दगावल्या; बर्ड फ्लूची भीती, प्रशासनाच्या चिंतेत भर

By मुकेश चव्हाण | Published: January 10, 2021 11:06 AM2021-01-10T11:06:47+5:302021-01-10T11:10:21+5:30

राज्यातील अमरावतीच्या बडनेऱ्यात गावांत २८ कोंबड्या दगावल्याची माहिती समोर आली आहे.

Bird Flu: Shocking! In Amravati, 28 hens were suddenly slaughtered; Add to the administration's concern | Bird Flu: धक्कादायक! अमरावतीत अचानक २८ कोंबड्या दगावल्या; बर्ड फ्लूची भीती, प्रशासनाच्या चिंतेत भर

Bird Flu: धक्कादायक! अमरावतीत अचानक २८ कोंबड्या दगावल्या; बर्ड फ्लूची भीती, प्रशासनाच्या चिंतेत भर

Next

अमरावती/ मुंबई: देशात केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा व हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लूची साथ आली असून, महाराष्ट्रामध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पक्ष्यांतूनच बर्ड फ्लूच्या विषाणूचे माणसांत संक्रमण होण्याची शक्यता असल्याने व या आजाराने मरण पावलेल्यांचे प्रमाणही अधिक असल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र या चिंतेत भर करणारी माहिती आता समोर आली आहे. 

राज्यातील अमरावतीच्या बडनेऱ्यात गावांत २८ कोंबड्या दगावल्याची माहिती समोर आली आहे. बडनेऱ्यात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील एकूण २८ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. अचानक जमिनीवर कोसळून कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, अशी माहिती त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याला दिली. तसेच या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे त्यांनी सांगितले. आधीच कोरोनाचं संकट असताना, आता बर्ड फ्लूने हातपाय पसरायला सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

डॉक्टरांनीदेखील तातडीने घटनास्थळी सहकार्याला पाठवून कोंबड्यांच्या नाकाद्वारा व गुदद्वारातून नमुने घेण्यास सांगितले. सदर नमुने अमरावतीच्या जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठविले असून, अहवाल आल्यानंतर त्या कोंबड्यांचा मृत्यू नेमके कशाने झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती डॉ. अनिल किटुकले यांनी दिली.

चीनमध्ये १९९६ साली सर्वप्रथम बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर, आजतागायत जगातील विविध भागात बर्ड फ्लूची साथ डोक वर काढत असते. २००६ मध्ये महाराष्ट्रात नंदूरबार येथे बर्ड फ्लू पसरला होता. बर्ड फ्लूच्या विषाणूचे माणसामध्ये संक्रमण झाल्यानंतर पहिला रुग्ण हाँगकाँगमध्ये १९९७ साली सापडला होता.

पंजाबमध्ये कोंबड्यांची आयात बंदी-

बर्ड फ्लूची साथ पंजाबमध्ये पसरू नये, म्हणून तेथील राज्य सरकारने अन्य राज्यांतून कोंबड्या, तसेच इतर पाळीव पक्षी आयात करण्यास १५ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. पंजाबशेजारील हरयाणा, हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव झाल्यामुळे पंजाब सरकार सतर्क झाले होते. या साथीचा लवलेशही पंजाबमध्ये नसला, तरी तेथील राज्य सरकार कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाही.

भारतातील बर्ड फ्लूचा इतिहास जाणून घ्या-

२००६ साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूनं संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या. तर ५ लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली. या संक्रमण काळात कुठल्याही मृत्यूची नोंद सापडत नाही

बर्ड फ्लूची लक्षणं काय?

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

Web Title: Bird Flu: Shocking! In Amravati, 28 hens were suddenly slaughtered; Add to the administration's concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.