कुलाबा, फोर्ट वगळता बाईक टॅक्सी बेलगाम; परिवहन मंत्र्यांच्या सूचनाही धुडकावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:20 IST2025-07-09T06:20:15+5:302025-07-09T06:20:42+5:30
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने चर्चगेट आणि सीएसएमटीवरून रॅपिडो बुक करण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी ही सेवा उपलब्ध नसल्याचे ॲपवर दाखवण्यात आले.

कुलाबा, फोर्ट वगळता बाईक टॅक्सी बेलगाम; परिवहन मंत्र्यांच्या सूचनाही धुडकावल्या
मुंबई : कुलाबा, फोर्ट परिसर (चर्चगेट आणि सीएसएमटी) वगळता संपूर्ण मुंबईत रॅपिडो ही सेवा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नरिमन पॉईंटजवळ स्वत: रॅपिडोची अनधिकृत बाईक टॅक्सी पकडली होती. त्यानंतर ही सेवा तत्काळ बंद करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले होते. असे असताना केवळ मंत्री सरनाईक यांनी पकडलेल्या भागात ही सेवा ॲपवरून बंद ठेवण्यात आली आहे. याबद्दल रॅपिडोच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने चर्चगेट आणि सीएसएमटीवरून रॅपिडो बुक करण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी ही सेवा उपलब्ध नसल्याचे ॲपवर दाखवण्यात आले. तसेच लोअर परळ आणि इतर भागात मात्र बाईक टॅक्सी उपलब्ध होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल नावाच्या वापरकर्त्याने लिहिले आहे की ‘रॅपिडो कायद्यापेक्षा मोठी आहे का? परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही बेकायदा बाईक टॅक्सी सेवा सुरू आहे. ते मंत्रालय परिसरात सेवा देत नसल्याचे दाखवून स्वत:ला वाचवत आहेत. तरीही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही.
केवळ रोजगारासाठी आमचे प्रयत्न
नाव न सांगण्याच्या अटीवर एका रायडरने सांगितले की, आम्ही १ एप्रिलपासून बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाने १ एप्रिलपर्यंत अधिकृतपणे जीआरही जारी केला नव्हता. आम्हाला बुकिंग ॲपद्वारे बुकिंग मिळण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीने कोणत्याही नवीन नियमांची आम्हाला माहिती दिलेली नाही. आम्ही रोजगारासाठी हे करत आहोत.