Join us

मुंबईकरांना मिळणार दिलासा, लवकरच धावणार बाईक टॅक्सी! परिवहन मंत्री सरनाईकांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:56 IST

Bike Taxi in Mumbai: मुंबईमध्ये यापूर्वी बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. पण, टॅक्सीचालक संघटनांच्या विरोधामुळे ती बंद करण्यात आली होती. 

Bike Taxi Service in Mumbai: वाहतूक कोंडी, टॅक्सीसाठी द्यावे लागणारे जास्तीचे पैसे यातून लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे. राज्याच्या परिवहन खात्याकडून मुंबईत बाईकटॅक्सी सुरू करण्यासंदर्भात वेगाने प्रक्रिया सुरू असून, पुढील काही दिवसांत या निर्णया मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधानभवन परिसरामध्ये माध्यमांशी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना मुंबईत बाईक टॅक्सी चालवण्याच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आले. यावेळी सरनाईक यांनी सविस्तर माहिती दिली. 

निर्णय घेण्याचे ठरले आहे -सरनाईक

"प्रामुख्याने महायुती सरकारच्या काळात तरुण-तरुणींना रोजगार मिळावा आणि प्रवाशांच्या प्रवासावरील खर्च कमी व्हावा म्हणून यासाठी देशातील २२ राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहे. राज्य सरकारनेही तो निर्णय घेण्याचे ठरवले आणि प्रक्रिया सुरू आहे", अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. 

कधीपर्यंत निर्णयाला मंजुरी दिली जाणार?

"या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळेल असं मला वाटतं. कारण काही सुरक्षिततेचे नियम जे आहेत, ते बाईक टॅक्सी चालवताना प्रवाशांसंदर्भात घेणं, गरजेचं आहे. गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे बाईक टॅक्सी चालवताना तरुण वा तरुणीसोबत कोणताही गुन्हा घडणार नाही, यासाठी काही निर्णय परिवहन खात्याच्या माध्यमातून घ्यायचे आहेत", असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

१० ते २० हजार रोजगार निर्मिती होणार

"एक गोष्ट मात्र नक्की आहे की, या राज्यातील १० ते २० हजार तरुण-तरुणींना रोजगार मिळण्यासाठी हा निर्णय घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आणि लवकरच त्या बाबतीत घोषणा होईल. कारण मुख्यमंत्र्यांचा जो शंभर दिवसांचा कार्यक्रम आहे, त्यामध्ये बाईक टॅक्सीला निर्णय देण्याचाही समावेश आहे", असे प्रताप सरनाईक म्हणाले. 

किती असणार भाडे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईक टॅक्सीसाठी प्रति किलोमीटरसाठी ३ रुपये भाडे आकारले जाणार आहे. बाईक टॅक्सीला जीपीएस यंत्रणा आवश्यक आहे. त्याचबरोबर बाईकस्वाराच्या पाठीमागे बसणाऱ्याला हेल्मेट घालणे सक्तीचे असणार आहे. जी कंपनी बाईक टॅक्सी सेवा देईल, तिच्या कमीत कमी ५० बाईक असणे आवश्यक आहे.

टॅग्स :प्रताप सरनाईकबाईकटॅक्सीमहाराष्ट्र सरकार