परराज्यांतील बाइकस्वारांचाही मुंबईकरांच्या जीवाशी खेळ! अवैध बाइक टॅक्सीचा सुळसुळाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:29 IST2026-02-24T13:28:24+5:302026-02-24T13:29:49+5:30
आता उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतूनही पेट्रोलच्या बाइक मुंबईत दाखल होत आहेत. विशेष म्हणजे, याबद्दलही आरटीओ अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे उघड झाले आहे.

परराज्यांतील बाइकस्वारांचाही मुंबईकरांच्या जीवाशी खेळ! अवैध बाइक टॅक्सीचा सुळसुळाट
मुंबई : मुंबई आणि आसपासच्या भागात सध्या बेकायदा पेट्रोल बाइक टॅक्सीचा मोठा सुळसुळाट असून, त्याकडे परिवहन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली या चारही आरटीओ कार्यालयांनी जानेवारीपासून आजच्या तारखेपर्यंत बेकायदा बाइक टॅक्सी विरोधात कारवाई केलेली नाही. त्यात आता उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतूनही पेट्रोलच्या बाइक मुंबईत दाखल होत आहेत. विशेष म्हणजे, याबद्दलही आरटीओ अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे उघड झाले आहे.
पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून शासनाने मुंबईत बाइक टॅक्सी पॉलिसी जाहीर केली. त्यानुसार संबंधित कंपनीला आरटीओ कार्यालयातून लायसन्स घेऊनच ही सेवा सुरू करण्याची परवानगी आहे.
ओला, उबर आणि रॅपिडो या तिन्ही कंपन्यांना ऑगस्टमध्ये ५० इलेक्ट्रिक बाइकची नोंदणी करून एक महिन्याचे तात्पुरते लायसन्स दिले होते. त्यानंतर इतर बाबींची पूर्तता करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या; परंतु कंपन्यांनी कोणत्याही बाबींची पूर्तता केली नसल्याने त्यांचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कंपनीला राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली होती.
ना चारित्र्य पडताळणी, ना उपाययोजनांची पूर्तता
मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांच्या म्हणण्यानुसार, रिक्षा किंवा टॅक्सीचे बॅज देताना पोलिस व्हेरिफिकेशन, त्याचा अधिवासाचा दाखला आदी कागदपत्रांची मागणी केली जाते.
संबंधिताने नियमांचे उल्लंघन केल्यास रिक्षा जप्त केली जाते. असे असताना बाइक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्या चालकांकडून कोणतीही कागदपत्रे घेत नाहीत. त्यामुळे अनपेक्षित घटना घडल्यास चालकाला शोधणार कुठे? महिला सुरक्षेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय कंपन्या असे धाडस करू शकत नाहीत.
तात्पुरत्या लायन्सची मुदतही संपली
तात्पुरत्या लायसन्सची मुदत संपून चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असला तरी तिन्ही कंपन्या राजरोसपणे पेट्रोल बाइक टॅक्सी सेवा चालवीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बैठकीत कंपन्यांना पेट्रोल वरून इलेक्ट्रिकवर शिफ्ट व्हायला एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.
मुंबईतील रस्त्यांवर धावताहेत उत्तर प्रदेश, बिहारच्या बाइक?
लोअर परळ रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी 'युपी२५इजेर २३७' क्रमांकाची 'होंडा अॅक्टिव्हा' आढळली. चालकाला विचारल्यावर रॅपिडोसाठी टॅक्सीसेवा चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या २ ते ३ महिन्यांपासून तो हे काम करत आहे. या कामासाठीच त्याने उत्तर प्रदेशातील आपल्या गावावरून बाइक मुंबईत आणली. दुसऱ्या राज्यात कोणतीही गाडी न्यायची असल्यास तिची पुन्हा नोंदणी करून टॅक्स भरावा लागतो.