Join us

‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:15 IST

Raj Thackeray And Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे सहकुटुंब पोहोचले.

Raj Thackeray And Uddhav Thackeray News: मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्ताने ५ वेळा एकत्र आले आहेत. यातच पुन्हा एकदा राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवर गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान राज ठाकरे यांच्या मातोश्रीही उद्धव ठाकरेंच्या घरी गेल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे प्रमुख राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले आहेत. ठाकरे बंधू सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी स्नेहभोजन करणार आहेत. मागील वेळेस उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवास्थानी राज ठाकरे यांना भेटण्यास गेले होते, मात्र ते एकटेच होते. आता मात्र राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर पोहोचले आहेत. यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नात्यात आणखीन दृढता वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते

ठाकरे बंधूंच्या सातत्याने वाढत असलेल्या भेटी तसेच उद्धवसेना आणि मनसे युतीबाबत दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून केले जाणारे भाष्य यामुळे या दोन्ही पक्षांच्या युतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अलीकडेच संजय राऊत यांच्या घरी बारशानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या भेटीनंतर राज ठाकरे आपल्या घरी न जाता थेट ‘मातोश्री’वर गेले. ‘मातोश्री’वर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मिळाला नसला तरी मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, कुणी काहीही म्हटले तरी आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद, व्यक्तिगत आणि राजकीय नाते अतिशय घट्ट झाले आहे. अगदी स्पष्ट सांगायचे झाले तर, कुणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी चर्चा फार दूरपर्यंत गेली आहे. आता माघारीचे दोर नाहीत. प्रकरण फार पुढे गेले आहे. हे दोन भाऊ कसे एकत्र येतात ते पाहू. मात्र तुमच्या छाताडावर पाय रोवून हे दोन्ही ठाकरे बंधू उभे राहण्याच्या मनस्थितीत आहेत, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते.

तीन महिन्यांत ५ वेळा भेट

- ५ जुलै: मराठी भाषेच्या मेळाव्यात एकत्र

-२७ जुलै: उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर

- २७ ऑगस्ट: गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी. 

- १० सप्टेंबर: चर्चेसाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी. - ५ ऑक्टोबर: संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र, त्यानंतर ‘मातोश्री’वर भेट

- १२ ऑक्टोबर (आज): मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनाचा कार्यक्रम.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray visits Matoshree again for lunch with Uddhav, family.

Web Summary : Amidst upcoming elections, Thackeray brothers' meetings increase. Raj Thackeray, with family, visited Uddhav at Matoshree for lunch, signaling stronger ties and potential alliance discussions.
टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनामनसेराजकारण