मीरा-भाईंदर मतदार यादीत मोठा 'घोटाळा'; मंत्री प्रताप सरनाईकांचा अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:09 IST2025-12-24T12:08:15+5:302025-12-24T12:09:38+5:30
आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी तक्रार करून हा घोटाळा एका राजकीय पक्ष व पालिका अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याने कारवाईची मागणी केली आहे.

मीरा-भाईंदर मतदार यादीत मोठा 'घोटाळा'; मंत्री प्रताप सरनाईकांचा अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर कारवाईचा इशारा
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीत घोटाळा हा एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा करून देण्यासाठी त्या राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या व पालिका अधीकारी - कर्मचारी यांच्या संगनमताने केला गेला असून त्या अधिकारी- कर्मचारी यांच्यावर कारवाईची तक्रार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी स्वरूपात महापालिका आयुक्तांना केली आहे.
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ घालण्यात आला होता. त्या मध्ये एका प्रभागातील नावे दुसऱ्या भागातील एक पासून तीन - तीन प्रभागात टाकण्यात आली. त्या प्रारूप यादीवरून तब्बल ७४० तक्रारी - हरकती झाल्या. मात्र त्या नंतर अंतिम यादीत देखील मोठे घोटाळे केले गेले. एकीकडे राज्य निवडणूक आयोगाने २२ डिसेम्बर रोजीच्या लेखी आदेशात एखाद्या प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेली असतील आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असेल तरी देखील महापालिका आयुक्तांना त्यात कारणांसह आदेश पारित करून सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसे असताना मीरा भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि पालिका प्रशासन मात्र आता निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे, आम्ही काही करू शकत नाही असे सरळ सरळ तक्रारदार यांना सांगून आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत होते.
आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी तक्रार करून हा घोटाळा एका राजकीय पक्ष व पालिका अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याने कारवाईची मागणी केली आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक साठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. उपलब्ध माहितीनुसार, काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सलग दोन दिवस रात्री उशिरापर्यंत महानगरपालिका कार्यालयात थांबून मतदार यादीत अनधिकृत व संशयास्पद बदल केल्याचा संशय व्यक्त आहे.
सदर अनियमिततेस महानगरपालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी असून, त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे, कौशिक घरत, महेश पाटील तसेच कर विभागाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांची नावे नमूद करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत या दीर्घकालीन रजेवर असल्याची माहिती आहे. महानगरपालिका मुख्यालयातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करण्यात आल्यास, संबंधित कालावधीत कार्यालयात उपस्थित असलेल्या व्यक्ती व झालेल्या कारवाईबाबत स्पष्टता येऊ शकते. याची गांभीर्याने दखल घ्यावी. निष्पक्ष व सखोल चौकशी करावी तसेच दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व व्यक्तींवर तातडीने प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी मंत्री सरनाईक यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याशी प्रतिक्रिया साठी संपर्क केला असता त्यांनी कॉल स्वीकारला नाही. तर जनसंपर्क अधिकारी राज घरत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देखील कॉल घेतला नाही.