रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:39 IST2025-11-01T14:39:00+5:302025-11-01T14:39:55+5:30
रोहित आर्या आणि त्यांची पत्नी अंजली आर्या हे पुण्यातील कोथरूड येथील शिवतीर्थ नगर येथे एका भाड्याच्या घरात राहत होते.

रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
मुंबईतील पवई भागातील एका स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलिस ठेववण्याचा प्रकार करणाऱ्या रोहित आर्याबद्दल आता अनेक खुलासे होत आहेत. ओलीस ठेवलेल्या मुलांचा जीव वाचवताना झालेल्या गोळीबारात रोहित आर्या याचा मृत्यू झाला. या दरम्यान रोहित या प्रकरणाची योजना गेल्या अनेक दिवसांपासून करत असल्याचे समोर आले आहे. तो ज्या घरात राहत होता, त्या घराच्या मालकासोबत देखील त्याचे वाद झाले होते.
'आजतक'च्या वृत्तानुसार, रोहित आर्या आणि त्यांची पत्नी अंजली आर्या हे पुण्यातील कोथरूड येथील शिवतीर्थ नगर येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी त्यांचे घरमालक देशपांडे यांच्याशी ३६ महिन्यांचा भाडे करार केला होता. मात्र, काही दिवसांतच शेजाऱ्यांच्या तक्रारी आणि आर्या कुटुंबाच्या अनुचित वर्तनाबद्दलच्या तक्रारींनंतर, घरमालकाने त्यांना घर सोडण्यासाठी नोटीस बजावली.
घर रिकामे करावे लागले, पण...
या प्रकरणामुळे घर मालक आणि रोहित आर्या यांच्यात वाद झाले होते. २ मार्च २०२५ पासून रोहित आर्याने भाडे देणे बंद केले. उलट त्यानेच घरमालक देशपांडे यांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाईची नोटीस पाठवली. अनेक वेळा वाटाघाटी आणि लेखी करार होऊनही, रोहित आर्या याने घर रिकामे करण्यास नकार दिला. अखेर घरमालकाने १.७५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे मान्य केले, परंतु तरीही रोहित आर्याने घर रिकामे करण्यास नकार दिला. अखेर, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मे २०२५मध्ये त्याने ते घर रिकामे केले.
नंतर कुठे राहत होते आर्या कुटुंब?
यानंतर रोहित आर्या हा नातेवाईकांसोबत राहत होता आणि घर सोडल्यापासून तो आर्थिकदृष्ट्या अडचणीत होता. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, या मानसिक ताणतणावामुळे आणि सूडाच्या भावनेमुळे त्याने ओलीस ठेवण्याचे कट रचला. पोलिसांनी सध्या देशपांडे यांनी दिलेली सर्व कागदपत्रे जमा केली आहेत आणि आरोपीची पार्श्वभूमी, मानसिक स्थिती आणि मोठ्या कट रचणाऱ्या नेटवर्कची भूमिका तपासत आहेत.