Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते नाना पाटेकरांना मोठा दिलासा; Me Too मोहिमेतील लैंगिक शोषणाची तक्रार कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 23:11 IST

तनुश्री दत्ता हिने Me Too  मोहीम सुरू असताना नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.

Nana Patekar: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीप्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळून आले नसल्याचं सांगत दंडाधिकारी कोर्टानं तनुश्री दत्ता हिची तक्रार फेटाळून लावली आहे. 

तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये  Me Too  मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्यासमोर सुनावणी झाली. नाना पाटेकरांच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. यावेळी मुंबई पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या आरोपात सादर केलेला क्लोजर रिपोर्ट आणि पुरेशा पुराव्यांअभावी कोर्टाने पाटेकर यांच्याविरोधातील तक्रार रद्द केली.

नेमकं काय घडलं होतं?  २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा गदारोळ झाला होता. या गाण्यातील एका दृश्यावर तनुश्रीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार देखील घेतली आणि ती परदेशात वास्तव्यास गेली. २०१८ साली ती परदेशातून भारतात आली आणि तिने महिला अत्याचाराविरोधातील Me Too ही  मोहीम सुरू असताना नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाची दखल घेऊन ओशिवरा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

नाना पाटेकरांचं म्हणणं काय?

लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या नाना पाटेकर यांनी काही महिन्यांपूर्वी एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली होती. "मला माहीत होतं की हे आरोप चुकीचे आहेत. म्हणून मला कधीच राग आला नाही. सगळे आरोप खोटे होते, तर मला राग का येईल? आणि या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. त्या घडून गेल्या आहेत. त्याबद्दल आता आपण काय बोलू शकतो? सगळ्यांना सत्य माहीत होतं. अचानक कोणीतरी येऊन म्हणतं की तू हे केलंस ते केलंस...मी याला काय उत्तर देऊ?" असं पाटेकर यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :नाना पाटेकरतनुश्री दत्तालैंगिक शोषणलैंगिक छळ