मोठी बातमी! विवेक फणसाळकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, संजय पांडे उद्या होणार निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 20:49 IST2022-06-29T20:36:43+5:302022-06-29T20:49:47+5:30
Vivek Phansalkar : आता त्यांच्या खांद्यावर मुंबईकरांच्या सुरक्षेची धुरा देण्यात आली आहे.

मोठी बातमी! विवेक फणसाळकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, संजय पांडे उद्या होणार निवृत्त
मुंबईचे पोलीस आयुक्त पदी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले विवेक फणसाळकर हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त बनले आहेत. ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदी असताना विवेक फणसाळकर यांची पदोन्नती करत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची मे २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या खांद्यावर मुंबईकरांच्या सुरक्षेची धुरा देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या निवृत्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त होणाऱ्या पदी फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा ही उद्या शेवटचा दिवस आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त आयपीएस कार्यभार अर्चना त्यागी यांच्याकडे देण्यात आला आहे. विवेक फणसाळकर यांची 31 जुलै 2018 रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षीच संपूष्टात आला होता. परंतू, त्यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी आणि कोरोना काळात त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी वर्गाने चांगल्या तऱ्हेने हाताळलेली ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची परिस्थिती लक्षात घेता, राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. उद्या म्हणजेच गुरुवारी सायंकाळी संजय पांडे यांच्याकडून विवेक फणसाळकर पदभार स्वीकारणार आहेत.