NCP Dhananjay Munde: करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार तक्रारीच्या सुनावणीदरम्यान वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने अंतरिम निकालात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. तक्रारकर्त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत त्यांना दरमहा १ लाख २५ हजार तर त्यांच्या मुलीला दरमहा ७५ हजार रुपये असे एकूण दोन लाख रुपये देखभाल खर्च म्हणून द्यावेत, असं न्यायालयानेधनंजय मुंडे यांना सांगितलं आहे.
मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही आठवड्यांपासून वादात सापडले आहेत. बीड जिल्ह्यातील पवनचक्की खंडणी प्रकरण, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, कथित पीक विमा घोटाळा, तसंच कृषी खात्यातील साहित्य खरेदी घोटाळ्यावरूनही मुंडे यांच्या गंभीर आरोप झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील सुनावणीवेळी मुंडे यांना करुणा मुंडे यांना देखभाल खर्च देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, "मंत्री असलेल्या पतीविरोधात मी लढत असलेली लढाई अत्यंत कठीण होती. कारण सर्व यंत्रणा त्यांच्या बाजूने होत्या. मी माझ्या वकिलांचे आभार मानते," अशी प्रतिक्रिया न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी दिली आहे.