Join us

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:49 IST

मराठा आरक्षणाबाबत तयार झालेला अंतिम मसुदा घेऊन राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला

मुंबई - मुंबई - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज ५ वा दिवस असून परिस्थिती चिघळू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची मागील काही दिवसांत ३-४ बैठका झाल्या. या बैठकीत मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. आता या मागण्यांबाबत अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा घेऊन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहचले.  

याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत, त्यावर भाष्य करू शकत नाही. हायकोर्टाच्या आदेशानुसार प्रशासन कार्यवाही करेल. उपसमितीच्या बैठकीत अंतिम मसुदा तयार केला आहे. तो मसुदा घेऊन आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जात आहोत. न्या. शिंदे समितीने जो आढावा घेतला होता, त्यावर उपसमितीत चर्चा झाली. कायद्याच्या चौकटीत बसणारा मसुदा २-३ दिवसांच्या चर्चेनंतर तयार केला आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच हा मसुदा घेऊन शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे यांच्यासह आम्ही जरांगे पाटील यांना भेटून मसुदा दाखवणार आहोत. त्यावर सकारात्मक तोडगा निघेल. कायद्याच्या चौकटीत आणि कसोटीत टिकावा असा मसुदा तयार करण्यासाठी वेळ गेला. जरांगेंनी मांडलेल्या मागण्यांचा समावेश त्यात केला आहे. या आंदोलनात सकारात्मक पद्धतीने सरकारची भूमिका राहिली आहे. शासनाच्या भूमिकेने जरांगे पाटील समाधानी होतील असा विश्वास आहे असंही विखे पाटील यांनी सांगितले आहे. 

आझाद मैदान रिकामे करा - हायकोर्ट

दरम्यान, हायकोर्टात मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यात हायकोर्टाने दुपारी ३ पर्यंत आझाद मैदान खाली करा असा आदेश दिला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी एक्शन मोडमध्ये येत आझाद मैदान परिसरात रस्त्यावरील सर्व आंदोलकांच्या गाड्या काढण्याच्या सूचना दिली आहे. त्याशिवाय आझाद मैदान परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली आहे. 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलराधाकृष्ण विखे पाटीलउच्च न्यायालयमराठा आरक्षण