Join us

मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 08:31 IST

आंदोलनाची दखल घेत आमदार कालिदास कोळंबकर हे आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली.

Mumbai Elphinstone Bridge: मुंबईतील परळ आणि प्रभादेवी परिसराला जोडणाऱ्या एल्फिस्टन ब्रिजच्या पाडकामाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिकांनी केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर एमएमआरडीएकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्रिजसंदर्भात सोमवारी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून सदर बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एल्फिन्स्टन ब्रिज शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले आणि त्यांच्याकडून या ब्रिजचे पाडकाम करू नये, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत आमदार कालिदास कोळंबकर हे आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाशीही संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांशी फोनवरून बोलणं झाल्यानंतर या पुलाचे पाडकाम स्थगित करण्यात आले असून सोमवारपर्यंत वाहतूक सुरू राहील, असे आश्वासन आमदार कोळंबकर यांनी दिलं. या आश्वासनानंतर स्थानिकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.

दरम्यान, स्थानिकांच्या पुनर्वसनासंदर्भातील मागण्यांबाबत सोमवारी बैठक होणार असून या बैठकीत तोडगा काढण्यात सरकारला यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रिज बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता?

एल्फिन्स्टन ब्रिज बंद झाल्यानंतर दादर पूर्वेकडून पश्चिमकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रीजचा वापर करता येणार आहे. तर, परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणारी वाहने करी रोड ब्रीजचा वापर करतील. परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी-लिंकच्या दिशेने जाणारी वाहने चिंचपोकळी ब्रीजचा वापर करतील. प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे जाणाऱ्या वाहनांना दुपारी ३  ते रात्री ११ या कालावधीत करी रोड ब्रीजचा वापर करता येणार आहे. 

टॅग्स :एल्फिन्स्टन स्थानकमुंबईमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसएमएमआरडीए