जॉर्ज यांच्यामुळे कामगार चळवळीचे मोठे नुकसान- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 08:20 AM2019-01-30T08:20:20+5:302019-01-30T08:24:54+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Big loss of labor movement due to George - Uddhav Thackeray | जॉर्ज यांच्यामुळे कामगार चळवळीचे मोठे नुकसान- उद्धव ठाकरे

जॉर्ज यांच्यामुळे कामगार चळवळीचे मोठे नुकसान- उद्धव ठाकरे

ठळक मुद्देशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जॉर्ज फर्नांडिस यांचा एक कालखंड होता. आपल्या पद्धतीने ते त्यांच्या काळात तळपत राहिले. जॉर्ज यांनी कामगारांना अर्थवादात ओढले व कामगार चळवळीचे नुकसान झाले.

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जॉर्ज फर्नांडिस यांचा एक कालखंड होता. आपल्या पद्धतीने ते त्यांच्या काळात तळपत राहिले. हा तळपणारा तारा आता निखळला. राजकीय क्षितिजावरील एक धगधगती मशाल विझली आहे. इतिहासाच्या पानावर जॉर्जचे नाव कुणाला पुसता येणार नाही, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

जॉर्ज यांनी कामगारांना अर्थवादात ओढले व कामगार चळवळीचे नुकसान झाले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. त्यापेक्षा देशाची आर्थिक राजधानी होती, त्यामुळे भरपावसाळ्यात पालिका कामगारांना संपात ढकलून ‘मागण्या’ मान्य करायच्या किंवा करून घ्यायच्या हे धोरण जॉर्ज यांनी कायम राबवले, असंही मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे.

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे 
- एखाद्या व्यक्तीचे राजकारण वा वैचारिक पंथाबद्दल तीव्र स्वरूपाचे मतभेद असले तरी व्यक्तिगतरीत्या मात्र तीच व्यक्ती लोकांचे प्रेम व आदर संपादन करीत असल्याचे आढळते. जॉर्ज हे अशाच अपवादात्मक व्यक्तींपैकी एक होते. 

- गेली अनेक वर्षे ते सार्वजनिक जीवनात नव्हते. पण जेव्हा होते तेव्हा त्यांचे असणे हे एखाद्या झंझावातासारखे होते. देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात तब्बल 50 वर्षे ते नुसते वावरले नाहीत, तर त्यांनी आपला ठसा उमटवला.

- बाजूच्या कर्नाटक राज्याच्या मंगळुरातून एक तरुण मुंबईत आला. कामगार नेते पी. डिमेलो यांच्याशी जोडला गेला. काही काळ मुंबईच्या फुटपाथवरच राहिला. त्याच फुटपाथवरून तो पुढे मुंबईच्या रस्त्यावर उतरला व कामगारांचा नेता म्हणून लढत राहिला. 

- पालिका कामगारांना भरपावसाळ्यात संपात उतरवून मुंबईस वेठीस धरण्याचे काम जॉर्ज अनेक वर्षे करीत राहिले. 
पण जॉर्जची तुफानी भाषणे व लढवय्या बाणा हे 70 च्या दशकांत मुंबईतील तरुणांचे आकर्षण होते. जॉर्ज यांचा काँग्रेसविरोध टोकाचा होता व त्यांनी त्याबाबत कधी तडजोड केली नाही. 

- मुंबईत त्या वेळी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे नेतृत्व कामगार मानत होते. गिरणी कामगारांचे ते सगळ्यात मोठे नेते होते. डांगे हे कम्युनिस्ट होते. कामगार चळवळीत डांगे यांचे योगदान महत्त्वाचे व त्या ताकदीवर ते कधीही मुंबई बंद करू शकत होते. 

- कोणतीही वैचारिक दृष्टी नसलेली व केवळ अर्थवादाचा स्वीकार केलेली अशी कामगार चळवळ डांगे यांना अभिप्रेत नव्हती. अखेरीस कामगारांचे राज्य स्थापन होईल आणि त्यासाठी कामगारांची मानसिक व वैचारिक तयारी करावयास हवी हे डांगे यांच्या संघटनेचे उद्दिष्ट होते. 

- जॉर्ज फर्नांडिस यांची भूमिका मात्र नेमकी त्याविरुद्ध होती. त्यांनी कामगारांना अर्थवादात ओढले व कामगार चळवळीचे नुकसान झाले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. त्यापेक्षा देशाची आर्थिक राजधानी, त्यामुळे भरपावसाळय़ात पालिका कामगारांना संपात ढकलून ‘मागण्या’ मान्य करायच्या किंवा करून घ्यायच्या हे धोरण जॉर्ज यांनी कायम राबवले. 

- स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासातील एकमेव रेल्वे संपाचे नेतृत्व त्यांनी केले, पण ते जेव्हा देशाचे रेल्वेमंत्री झाले तेव्हा ज्या मागण्यांसाठी त्यांनी आधी रेल्वे संप घडवून आणला होता त्या मागण्या ते रेल्वेमंत्री म्हणून पूर्ण करू शकले नाहीत. 

- तरीही ते कामगारांचे नेते म्हणून तळपत राहिले. त्यांच्या वागण्यात साधेपणा होता व भाषणात जोश होता. 1967 साली याच भांडवलावर ते मुंबईतून लोकसभा लढले व स. का. पाटील यांच्यासारख्या मोठय़ा नेत्याचा पराभव केला. अर्थात 1971च्या इंदिरा लाटेत तेच जॉर्ज मुंबईतून पराभूत झाले. जॉर्ज हे लढवय्ये नेते होते. 

- कुणालाही स्थैर्य व मनःशांती लाभू द्यायची नाही व स्वतःच बांधलेले घर मोडण्यास कारणीभूत ठरण्याचा अस्सल समाजवादी दुर्गुण त्यांच्यातही होता. अर्थात ‘मंगलोरी’ जॉर्ज नंतर पक्के मराठी झाले व मराठी अस्मितेच्या लढ्यात पुढे राहिले. 

- मुंबई महापालिकेचा कारभार मराठी भाषेतच चालायला हवा ही मागणी महापालिकेच्या सभागृहात सर्वप्रथम केली जॉर्ज फर्नांडिस यांनी. त्यांनी मराठी भाषेतले पहिले पुस्तक वाचले ते ‘श्यामची आई.’ कोकण रेल्वे रुळावर आणायचे कर्तृत्व जॉर्ज यांचेच आहे. 

- कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना, बाजारातून पैसा उभा करण्याची कल्पना, इथपासून ते श्रीधरन यांची नेमणूक करून त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणारे जॉर्जच होते. पण लोकांनी जॉर्जना लक्षात ठेवले ते संघर्ष करणारा नेता म्हणून. 

- आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून सत्ताधारी काँग्रेसला त्यांनी सळो की पळो करून सोडले. त्यांनी इंदिरा गांधी यांचे सरकार क्रांतिकारी किंवा दहशतवादी मार्गांनी उलथवून टाकण्याचा कट रचला. 

- डायनामाईट स्फोटकांचा वापर करून बॉम्ब बनवले. त्यांना देशात हिंसाचार माजवायचा होता. या आरोपाखाली त्यांना अटक झाली. हातात बेडय़ा घालून जॉर्जना तुरुंगातून दिल्लीच्या न्यायालयात नेले जात असे. 

- तेव्हा एखाद्या योद्धय़ाच्या तोऱ्यात ते पोलिसांच्या गाडीतून उतरत व लोकांना अभिवादन करीत. तुरुंगात त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले गेले. मात्र त्या वेदना कुरवाळत न बसता ते पुढे गेले. 

- वाजपेयी, मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंगांच्या मंत्रिमंडळात ते होते. पण संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम मोठे आहे. ‘पोखरण’चा अणुस्फोट त्यांच्याच काळात झाला व हिंदुस्थान अणुशक्ती बनला.
 

Web Title: Big loss of labor movement due to George - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.