ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:23 IST2025-12-31T15:22:14+5:302025-12-31T15:23:58+5:30
MNS Leader Join Shiv Sena Shinde Group: मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत.

ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
MNS Leader Join Shiv Sena Shinde Group: राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्मचे वाटप सुरू होताच भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तिकीट नाकारल्याने भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, तर काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. राज्यातील २९ मनपा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. एकीकडे अर्ज भरण्याची धामधूम, उत्साह, जल्लोष, नाराजी, संताप सुरू असलेला मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला. माजी नगरसेवकांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली. मराठी मुद्द्यांवरून अनेक वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. यानंतर ठाकरे बंधू केवळ मराठीसाठी नाही, तर राजकीयदृष्ट्याही एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. अखेरीस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीवर शिक्कामोर्तब केले. मुंबई मनपात शिवसेना ठाकरे गटासोबत मनसेची युती आहे. मुंबई मनपाच्या एकूण २२७ जागांपैकी मनसे ५३ जागा लढवणार आहे. तर शिवसेना ठाकरे गट १६३ जागा लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ११ जागा देण्यात आल्या आहेत. या घडामोडीत मनसेतून गळती सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यादेखील उपस्थित होत्या, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण मुंबई, मलबार हिल विधानसभा प्रभारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना अध्यक्ष परेश तेलंग यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला होता.
दरम्यान, मुंबईतील सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्राचे मनसे शाखाध्यक्ष शंकर कवितकर, माजी शाखाध्यक्ष रामचंद्र देवेंद्र, उप शाखाध्यक्ष प्रशांत इंगवले, राजू गायकवाड, गणेश गुरुराम यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता. धारावी विधानसभा क्षेत्रातील मनसे विद्यार्थी सेना विभाग सचिव बालनितीन बाडार, उपविभाग अध्यक्ष एस.जे.रॉबर्ट बाडार, उपविभाग अध्यक्ष कबीर राज, उपविभाग अध्यक्ष महेंद्र कोलड्री यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.