मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 20:55 IST2025-11-15T20:55:29+5:302025-11-15T20:55:58+5:30
मुंबईतील भायखळा येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पायाचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
मुंबईतील भायखळा येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पायाचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पाया खोदण्याचे काम सुरू असताना माती आणि ढिगारा खाली कोसळल्याने हे मजूर त्यात दबले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील भायखळा पश्चिम परिसरात एका निर्माणाधीन इमारतीत ही मोठी दुर्घटना घडली. या अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. इमारतीच्या पायाभरणीचे आणि पाइलिंगचे काम सुरू असताना हा अपघात झाला. यावेळी माती आणि ढिगारा कोसळल्याने पाच मजूर त्यात दबले गेले. तातडीने सर्व मजुरांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
मृत आणि जखमी मजुरांची नावे
मुंबईतील भायखळा येथील हबीब मन्शन, हंस रोड येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत फाउंडेशनचे काम सुरू असताना हा अपघात झाला. कामाच्या ठिकाणी अचानक माती आणि ढिगारा कोसळून एकूण ५ मजूर गंभीर जखमी झाले.
जखमी मजुरांना तातडीने नायर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाच्या माहितीनुसार, राहुल आणि राजू या दोन मजुरांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सज्जाद अली, सोबत अली आणि लाल मोहम्मद यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनास्थळी बचाव पथक दाखल
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केले. या अपघाताचे नेमके कारण काय होते, तसेच बांधकाम सुरू असताना सुरक्षा प्रक्रियेचे पालन केले गेले होते की नाही, याची चौकशी सुरू आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.