डबेवाल्यांसाठी आता रेल्वे स्थानकांबाहेर सायकल स्टँड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:42 IST2018-10-28T05:11:13+5:302018-10-28T06:42:30+5:30
पालिका महासभेपुढे ठरावाची सूचना: दररोज दोन लाख डबे चर्चगेट ते विरार, सीएसएमटी ते कल्याणमध्ये पोहोचवले जातात

डबेवाल्यांसाठी आता रेल्वे स्थानकांबाहेर सायकल स्टँड
मुंबई : चाकरमान्यांची भूक भागविण्याचे काम गेली कित्येक दशके मुंबईतील डब्बेवाले करीत आहेत. सायकल व रेल्वेच्या माध्यमातून जेवणाचे डब्बे विविध कार्यांलयात वेळेत पोहोचविण्याचे काम डबेवाले करीत असतात. रेल्वे स्थानकाबाहेर जवळपास असणाऱ्या
महापालिकेच्या जागांवर डबेवाल्यांसाठी सायकल स्टँड उभारावे, अशी मागणीच ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेच्या महासभेपुढे करण्यात
आली आहे.
दक्षिण मुंबईत असलेल्या कार्यालयांना डबेवाल्यांमार्फत डबे पोहोचविण्याचे काम १८७० पासून सुरू आहे. तेव्हापासून आजतागायत
डबेवाले हे काम करीत आहेत. दररोज सुमारे दोन लाख जेवणाचे डबे चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण व नवी मुंबई येथील विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयांत पोहोचविले जातात. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा, बंद, अतिवृष्टी असो, डबे वेळेत पोहोचविण्याचे आणि जेवून रिकामी झालेले डबे पुन्हा घरी पोहोचविण्याचे काम ते करीत असतात.
मुंबईतील डबेवाल्यांच्या डबे पोहोचविण्याच्या चोख व्यवस्थापनाच्या कौशल्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. डबेवाल्यांचा सन्मान परदेशातही करून त्यांना ‘मॅनेजमेंट गुरू’ असे संबोधण्यात आले आहे. मात्र, रेल्वे स्थानकांबाहेर त्यांच्या सायकली उभ्या
करण्याची सुविधा नसल्याने, त्यांना गर्दीच्या वेळी खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांची ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्राधिकरण या नात्याने पालिकेने रेल्वे स्थानकांबाहेर सायकल स्टँड उभारण्याची मागणी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी महासभेत केली आहे.