Join us

भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा आज बंद, सामाजिक सलोखा जपण्याचं आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 09:18 IST

मुंबईच्या डबेवाल्यांनी आज जेवणाचे डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा,  असे आवाहनही मुंबईचे डबेवाल्यांनी केले आहे.  

मुंबई - भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद महाराष्ट्राभर उमटत आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. जागोजागी वाहतूक खोळंबते. याचा परिणाम डबेवाल्यांच्या सेवेवरदेखील होतो. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी आज जेवणाचे डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा,  असे आवाहनही मुंबईचे डबेवाल्यांनी केले आहे.  

 

 

जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.  दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :भीमा-कोरेगावमुंबईमहाराष्ट्र