भारत जोडो न्याय यात्रेची शिवाजी पार्कवरील सभा ऐतिहासिक होईल, काँग्रेसने व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 20:13 IST2024-03-10T20:12:58+5:302024-03-10T20:13:28+5:30
Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधी यांचे मुंबईत भव्य स्वागत करण्याबरोबरच शिवाजी पार्कवरील सभाही ऐतिहासिक करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे, अशी माहिती सभेच्या समन्वय समितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी दिली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेची शिवाजी पार्कवरील सभा ऐतिहासिक होईल, काँग्रेसने व्यक्त केला विश्वास
मुंबई - भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा शिवाजी पार्कवर होत असून या सभेची तयारी सुरु आहे. इंडिया आघाडीच्या या सभेसाठी काँग्रेस पक्षाने समन्वय समिती स्थापन केली आहे. राहुल गांधी यांचे मुंबईत भव्य स्वागत करण्याबरोबरच शिवाजी पार्कवरील सभाही ऐतिहासिक करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे, अशी माहिती सभेच्या समन्वय समितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी दिली आहे.
शिवाजी पार्कवर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेसंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज कोकण विभागातील जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर माहिती देताना नसीम खान म्हणाले की, शिवाजी पार्कवर होणारी सभा व राहुलजी गांधी यांच्या मुंबईतील स्वागतासंदर्भात यावेळी चर्चा झाली. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे व मुंबईतील सभेतूनच इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुक प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. इंडिया आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्राने अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. आता न्याय यात्रा व शिवाजी पार्कवरील सभेलासुद्धा प्रचंड जनसमर्थन मिळेल असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला आहे.
आजच्या या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, आशिष दुआ, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, कोषाध्यक्ष डॉ. अमरजित मनहास, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, राजेश शर्मा, राजन भोसले, मुझ्झफर हुसेन, जोजो थॉमस, ब्रिज दत्त, भावना जैन, श्रीरंग बरगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.