Join us  

Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 7:30 AM

Bharat Bandh : भारत बंदवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांसहीत सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला आहे

मुंबई- देशभरात दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे. या बंदवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांसहीत सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला आहे. ''भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? आम्हाला महागाईत होरपळणार्‍या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत? जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

(Bharat Bandh Live Updates: 'भारत बंद'ला सुरुवात; ओदिशात रेल्वे रोखलीसामना संपादकीयमधील ठळक मुद्दे :- महागाईचे चटके जनता रोज सोसत आहे. हे आता फक्त चटके राहिले नसून जनता महागाईच्या वणव्यात होरपळून निघाली आहे. सरणावरील चिता पेटवण्यासाठी जशी आग लागते तशीच ही आग असून जनतेला जाळून मारण्यासाठीच ही महागाईची आग लावली आहे. त्यामुळे या आगीने होरपळलेली जनता जागी नाही व तिला जागे करावे यासाठी हा ‘बंद’ आहे हे तत्त्वज्ञान पटणारे नाही. जनता जागीच आहे. ती 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करील. 

- मोदींचे सरकार सर्वच आघाड्यांवर ‘फेल’ असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. इतर आम्हाला काही माहीत नाही, पण महागाईने जनतेला नागडे केले आहे.  

- डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले की वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे धान्य, भाज्या, दूध, प्रवास अशा सर्वच गोष्टी सध्या महाग झाल्या आहेत. या परिस्थितीत जनतेने जगायचे कसे? 

- महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, एक दिवस भाजपचे नेते होऊन दाखवा. मग सरकार चालवणे किती अवघड आहे ते कळेल. आमचे पाटलांना सांगणे आहे, सरकार व भाजपकडे चारही बाजूने पैसाच पैसा येत आहे व त्यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. आम्ही सांगतो, भाजप नेते होणे सोपे आहे. एक दिवस होरपळीत सापडलेल्या सामान्य जनतेचे जीवन जगून दाखवा. ते शक्य आहे काय?  

- सामान्य माणसाच्या नशिबी सध्या प्रवासातही खड्डा आणि पोटातही खड्डाच आला आहे. विरोधी पक्षाने ‘बंद’ पुकारला म्हणून त्यांच्या नावाने बोटे का मोडता? सरकारला शेतकर्‍यांचे संकट दूर करता आले नाही. 

- विकास दर वाढत असल्याची जाहिरात करता तशी इंधन दर रोजच वाढत असल्याचे सरकारी फलकही लावा. 

- भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? 2019 ला विरोधी पक्षात बसल्यावर नवा ‘बंद’ पुकारून ते महागाईवर बोलणार आहेत काय? महागाईचा प्रश्न जनतेच्या जीवन-मरणाचा आहे हे ज्यांना समजले तोच राज्यकर्ता. 

- जनता जागीच आहे, पण झोपलेले विरोधी पक्ष आता जागे झाले व त्यांनी ‘बंद’ पुकारला. ‘बंद’मध्ये शिवसेना का सामील होत नाही हा प्रश्न आता विचारला जाईल. आम्हाला महागाईत होरपळणार्‍या जनतेविषयी सहानुभूती आहे. आम्ही जनतेची बाजू नेहमीच मांडली. 

- विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. देशात लोकशाही आहे. जनतेची भावना मांडणारा विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करीत असेल तर त्यातच राज्याचे व देशाचे हित असते. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत?  

  

टॅग्स :भारत बंदउद्धव ठाकरेभाजपाकाँग्रेस