Join us

भाषा संपली तर संस्कृतीची नाळ तुटेल; प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 07:59 IST

राजभाषा गाैरव दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी राजभाषा  दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्क येथे अभिजात मराठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रत्येक आईने आपल्या मुलाशी आपल्या मातृभाषेत बोलले पाहिजे. जर आई आणि मुलांत मातृभाषेत संवाद झाला नाही तर त्या मुलांची भाषा तुटेल. पर्यायाने त्यांची संस्कृतीशी असलेली नाळ तुटेल आणि मग ते कुठलेच राहणार नाही. भाषा ही आपली ओळख आहे. त्यामुळे मातृभाषा येणे हे अतीव गरजेचे आहे. वृक्ष जेवढा मोठा आणि विस्तीर्ण तेवढीच त्याची मुळे खोलवर रुतलेली असतात. तसेच भाषेचे आहे. ती जेवढी वाढेल तेवढी त्याची मुळे अधिक रुजतील, असे मत ज्येष्ठ गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी राजभाषा  दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्क येथे अभिजात मराठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलते होते. अनेक शतकांपासून मराठी भाषेमध्ये उत्तुंग साहित्याची निर्मिती झाली. मात्र, ते साहित्य केवळ मराठीपुरते सीमित राहिले. मराठीतले हे दर्जेदार साहित्य जगभरात पोहोचण्यासाठी त्याचा अनुवाद होण्याची नितांत गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. ज्यावेळी युरोपमध्ये महिलांना कविता केल्यावरही पुरुषांच्या नावावर प्रसिद्ध कराव्या लागत होत्या, त्या काळात महाराष्ट्रात संत मुक्ताबाई, संत जनाबाई, बहिणाबाई यांनी केलेल्या कवितांमुळे त्या सुपरस्टार ठरल्या होत्या. हे पुढारलेपण महाराष्ट्राने अनुभवले आहे. त्यामुळेच मराठी साहित्य जगभरात पोहोचण्यासाठी त्याचा अनुवाद होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मनसेतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, साहित्य, राजकारण, पत्रकारिता, चित्रपट क्षेत्र अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या मान्यवरांनी नवरसपूर्ण आणि आशयगर्भित मराठी कविता सादर केल्या. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये जमलेल्या भव्य गर्दीने काव्यसुगंध अनुभवला. 

कोण तू रे कोण तू ?मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित “कोण तू रे कोण तू कालिकेचे खङग तू ? की इंदिरेचे पद्म तू ? जानकीचे अश्रू तू ? की उकळता लाव्हाच तू ? ही कविता त्यांच्या खास ठाकरी आवाजात सादर केली. 

अन् आशाताई गायल्याखरं तर मला राज ठाकरे यांनी कविता वाचायला सांगितले आहे. गायचे नाही, अशी फिरकी घेत आशा भोसले यांनी सुरेश भट लिखित केव्हा तरी पहाटे ही गझल पहिल्यांदा वाचली.  दुसऱ्याच कडव्यानंतर त्यांनी या गझलेची तान पकडली आणि रसिक प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. 

आजचा दिवस हा राज’दिवस : डॉ. विजय दर्डाआज मराठी राजभाषा दिन आहे आणि या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांनी मला विशेष निमंत्रित केले. त्यामुळे हा ‘राज’दिवस आहे, असे भाष्य लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केले. डॉ. विजय दर्डा यांनी यावेळी कुसुमाग्रज यांची सामाजिक सलोख्यासाठी अंतर्मुख करायला लावणारी ‘अखेर कमाई’ ही कविता सादर केली. तसेच, १९७६ मध्ये त्यांनी स्वतः लिहिलेली ‘अंतिम तारीख’ ही कविता देखील सादर केली. 

टॅग्स :राज ठाकरेमराठी भाषा दिनमनसे