नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:09 IST2025-09-27T13:08:17+5:302025-09-27T13:09:35+5:30
‘एआय’ टूल्सच्या मदतीने गैरवापर होण्याचा धोका, खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
मुंबई - स्वतःचे हटके आणि सुंदर फोटो तयार करण्यासाठी अनेक जण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापरत आहेत. मात्र, याच ‘एआय’चा वापर चुकीच्या मार्गाने होऊ लागल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः इंटरनेटवरून फोटो ‘उचलणे’ आणि त्यांचा गैरवापर करणे हे एक मोठे संकट बनत चालले आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
‘एआय’च्या साहाय्याने आता कुणाचाही फोटो अत्यंत अचूकतेने बदलता येतो. ‘एआय’ टूल्सच्या मदतीने चेहरा दुसऱ्याच्या शरीरावर लावणे, बनावट फोटो तयार करणे किंवा अश्लील स्वरूपात फोटो मॉडिफाय करणे हे सहज शक्य झाले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यास संबंधित व्यक्तीच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसू शकतो.
काय काळजी घ्यायल?
नेहमी अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर करा. कोणतेही ॲप वापरण्यापूर्वी त्याबाबत युजर्सचे रिव्ह्यू आणि रेटिंग तपासा. वेबसाइट उघडल्यानंतर, फेक वेबसाइटवर येऊ नये म्हणून त्याची यआरएल काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. कधीही संवेदनशील किंवा वैयक्तिक फोटो अपलोड करू नका. कोणत्याही सोशल मीडिया ट्रेंडला आंधळेपणाने फॉलो करू नका. हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते, असे आवाहन वेळोवेळी सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
विनापरवानगी वापर
खासगी आयुष्य धोक्यात येण्याची भीती आहे. अनेकवेळा व्यक्तीची परवानगी न घेता त्यांचे फोटो वापरले जातात. यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. फोटोच्या साहाय्याने फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा सामाजिक बदनामी अशा घटनाही उघडकीस येत आहेत.
... तर ब्लॅकमेलिंगची धास्ती
तुमचा डेटा चुकीच्या व्यक्तीला मिळाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. फसवणुकीसाठी बनावट प्रोफाइल तयार केली जाऊ शकते.
तुमच्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील
फोटो किंवा व्हिडीओही तयार केले जाऊ शकतात. आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचा धोका सुद्धा वाढतो.
डेटा लिक होण्याची भीती
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्या युझर्सना त्यांची निष्काळजी महागात पडू शकते. सायबर गुन्हेगार फेक ॲप्स, वेबसाइटद्वारे युझर्सची खासगी माहिती तसेच फोटोचा गैरवापर करण्याचा धोका अधिक आहे. सर्रास आपले फोटे सोशल मीडियावर शेअर करू नका.