Join us  

गाफीलपणा नको, सावधान, तिसरी लाट येऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 5:21 AM

मुख्यमंत्री ठाकरे; गाफीलपणा नको, मुकाबल्यासाठी राज्य सरकार सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपण जात असताना आता देशाच्या वैज्ञानिक सल्लागारांनी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली असल्याने कोणीही गाफील राहू नका, असे आवाहन मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी केले आहे. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आजच मुंबईतील कोरोना लढ्याचे कौतुक केले आहे. सरकार, मुंबई महापालिकेबरोबरच जनतेच्या संयमाचे हे यश आहे. आज आपण कोरोनाबाबत धोक्याच्या वळणावर उभे आहोत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ किंचित कमी होत असली तरी काही ठिकाणी ती वाढत आहे. त्यामुळे निर्बंध हे पाळावेच लागतील. लॉकडाऊन, निर्बंध ही कोरोनाविरुद्धच्या लढ्याची अपरिहार्यता आहे.राज्यातील आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवल्या जात आहेत. लसींचा पुरवठा केंद्र सरकार हळूहळू वाढवत आहे. आपली दररोज पाच लाख लसीकरणाची तयारी आहे पण पुरवठा मर्यादित आहे, तो लवकरच वाढेल. २०० मेट्रिक टन जादा ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी आपण केंद्र सरकारकडे केलेली आहे. केंद्राने ठरवून दिलेल्या कोट्याइतकी रेमडेसिविर इंजेक्शन मिळालेली नाहीत. काही ठिकाणी तक्रारी जरुर आहेत मात्र प्रत्येक जिल्ह्याला गरजेनुसार पुरवठा केला जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १२३ दिवसांवरमुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधी १२३ दिवसांवर गेला असून, दिवसभरात ३,८७९ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, तर ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३,६८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६ लाख ६४ हजार २९९ वर पोहोचला आहे, मृतांचा एकूण आकडा १३ हजार ५४७ वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनामुक्तांची संख्या ५ लाख ९८ हजार ५४५ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या ५१,४७२ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. २८ एप्रिल ते ४ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.५४ टक्के असल्याची नोंद आहे. 

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या १०२ चाळी, झोपडपट्ट्या प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केल्या आहेत, तर ७२८ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील केल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ३५,३७७, तर आतापर्यंत एकूण ५५,७८,२३६ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :मराठा आरक्षणउद्धव ठाकरेमुख्यमंत्री