Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Heatwave Alert: मुंबईकरांसाठी दिवस अतिशय 'ताप'दायक; महामुंबई पुन्हा तापणार; पारा ४२ वर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 10:09 IST

Mumbai Heatwave Weather Alert: पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत हवामान उष्ण राहील. दरम्यान, रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात आले असले तरी यामध्ये सोमवारी वाढ होण्याची शक्यता आहे.

महामुंबई मध्ये उष्णतेची लाट ११ मार्चपर्यंत कायम राहणार असून १२ आणि १३ तारखेला तापमान किंचित खाली येईल. तर उष्णतेच्या लाटेचा विपरीत परिणाम म्हणून रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड या परिसरात कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबईचे तापमान ३९ ते ४१ अंशांच्या आसपास राहील. तर मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशांच्या आसपास राहील. १३ मार्चनंतर उत्तर पश्चिम दिशेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर कमाल तापमानात किंचित घसरण होईल. परंतु तोवर मात्र मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्ण वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण हवामान कायम राहणार असून कमाल तापमानाचा पारा ३६ ते ४० च्या आसपास नोंदविण्यात येईल. पुण्यात कमाल तापमान ३६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल.अश्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

कडक उन्हामुळे मुंबईकरांसाठी दिवस अतिशय 'ताप'दायक ठरत आहे. मरीन ड्राईव्ह म्हणजेच मुंबईचा क्वीन्स नेकलेस नेहमीच पर्यटकांनी गजबजून जातो. नजर जाईल तिथवर अथांग समुद्र नजरेत साठवण्याचा प्रयत्न असतो. परंतु, कडक उन्हामुळे गेल्या दोन दिवसांपासून हाच मरीन ड्राईव्ह ओस पडल्याचे चित्र आहे. तुरळक पर्यटक, मुंबईकर येथे फेरफटका मारताना दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai braces for heatwave; temperature to soar to 42 degrees.

Web Summary : Mumbai faces a heatwave with temperatures potentially reaching 42°C in surrounding areas. The heatwave is expected to last until March 11th, with slight relief afterward. Marine Drive sees fewer visitors due to the intense heat.
टॅग्स :उष्माघातहवामान अंदाजसमर स्पेशलमुंबई