खबरदार, विमानात धिंगाणा घालाल तर..., दोषी आढळल्यास प्रवासबंदी, गैरप्रकार करणाऱ्या प्रवाशांविरोधात डीजीसीएच्या मार्गदर्शक सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:06 IST2023-04-18T09:06:09+5:302023-04-18T09:06:25+5:30
Airplane: विमान हवेत उडाल्यानंतर धूम्रपान करणे, मध्येच उठून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे, केबिन क्रूशी अश्लाघ्य वर्तन करणे, सहप्रवाशाला धक्काबुक्की करणे इत्यादी प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत.

खबरदार, विमानात धिंगाणा घालाल तर..., दोषी आढळल्यास प्रवासबंदी, गैरप्रकार करणाऱ्या प्रवाशांविरोधात डीजीसीएच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई : विमान हवेत उडाल्यानंतर धूम्रपान करणे, मध्येच उठून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे, केबिन क्रूशी अश्लाघ्य वर्तन करणे, सहप्रवाशाला धक्काबुक्की करणे इत्यादी प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) कठोर पावले उचलली आहेत. गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना कडक शिक्षा करण्याच्या सूचना डीजीसीएने विमान कंपन्यांना दिल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत विमान प्रवाशांच्या गैरवर्तनाचे प्रकार वाढीस लागले आहेत. यासंदर्भातील पाच अतिशय गंभीर घटना उघडकीस आल्या. या प्रत्येक घटनेत विमान कंपन्यांनी स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल करतानाच एअरक्राफ्ट रूल्स १९३७ या कायद्यांतर्गत असलेल्या विविध तरतुदींनुसार विमान कंपन्याही संबंधित प्रवाशावर कारवाई करू शकतात, असे सूचित करण्यात आले आहे. अशा घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने डीजीसीएने जारी केलेल्या सूचनांमध्ये पुढील सूचनांचा समावेश आहे.
प्रवाशाने विमान कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गुन्हा श्रेणी-१ मध्ये वर्ग करावा.
कर्मचाऱ्याला मारहाण केली किंवा कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन केले तर त्याची नोंद श्रेणी-२ अंतर्गत करावी.
विमान प्रवासाला धोका संभवेल किंवा तत्सम प्रकारचे काही वर्तन केले तर त्याची नोंद श्रेणी-३ मध्ये करावी.
या तिन्ही श्रेणींअंतर्गत गुन्ह्याची पडताळणी करून संबंधित प्रवाशावर किमान एक महिना ते कमाल कायमची विमान प्रवासबंदी करता येऊ शकेल.
अशा घटनांविरोधात संबंधित प्रवाशावर कारवाई करण्यासाठी विमान कंपन्यांनी एक अंतर्गत समिती स्थापन करावी.