सावधान, संकेतस्थळावरून लग्न जुळवणे पडू शकते महाग; लग्नाच्या नादात खिसा रिकामा; केला जातोय असा बहाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:31 IST2024-12-31T14:31:09+5:302024-12-31T14:31:59+5:30
अशा घटनांमुळे हात पिवळे होण्यापूर्वीच खिसा रिकामा होत आहे. त्यामुळे ऑनलाइन जोडीदार शोधताना सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सावधान, संकेतस्थळावरून लग्न जुळवणे पडू शकते महाग; लग्नाच्या नादात खिसा रिकामा; केला जातोय असा बहाणा
मुंबई : विवाह संकेतस्थळावरून ओळख करायची. कधी पायलेट तर कधी इंजिनिअर असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर परदेशातून महागडे गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली बनावट कस्टम अधिकाऱ्याच्या मदतीने फसवणूक केल्याचे प्रकार घडतात. अशा घटनांमुळे हात पिवळे होण्यापूर्वीच खिसा रिकामा होत आहे. त्यामुळे ऑनलाइन जोडीदार शोधताना सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सायबर पोलिसांसह मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत नायजेरियन नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या अकरा महिन्यांत विवाह संकेतस्थळावरून फसवणुकीचे १३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी अवघ्या ४ गुन्ह्यांची उकल करत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच्या घटनांमध्ये पत्नीच्या निधनानंतर आलेल्या एकटेपणाला कंटाळून, तसेच आजारपणात सोबत हक्काची व्यक्ती हवी म्हणून वयाच्या ७० व्या वर्षी एका आजोबांनी पुनश्च हरिओम करण्याचे ठरवले. आयुष्यावर आलेले एकटेपणाच्या लॉकडाउनचे मळभ दूर करण्यासाठी आजोबांनी मित्राच्या मदतीने लग्नही जुळवले; परंतु लग्नाच्या बेडीचे कायदेशीर सोपस्कार होण्याआधीच ४४ वर्षीय वधूने घरातील दीड लाख रुपये, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे घेऊन पोबारा केला. इकडे दुसऱ्या लग्नामुळे सोबत मिळेल या आशेवर असलेल्या आजोबांना मंडपात फेरे घेण्याऐवजी पोलिस ठाण्याच्या चकरा मारण्याची वेळ आली. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला.
वृद्ध, घटस्फोटित मंडळी सॉफ्ट टार्गेट
- विवाह संकेतस्थळ, सोशल मीडियाच्या माध्यमातून वृद्ध, तसेच घटस्फोटित, तसेच दुसऱ्या विवाहाचे स्वप्न रंगविणारी
मंडळी सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसत आहे.
- त्यामुळे वेळीच सतर्क होण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
गोपनीय माहिती शेअर करू नका...
ऑनलाइन जोडीदार शोधताना त्याची माहिती मिळविणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीला गोपनीय माहिती, पासवर्ड, तसेच वैयक्तिक फोटो शेअर करू नका.
पैशाची मागणी होताच वेळीच सतर्क होत संवाद थांबवा. कुणावर संशय असल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले.
ज्येष्ठांसह घटस्फोटित महिला टार्गेट
ज्येष्ठ नागरिकांसह घटस्फोटित महिला यात सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसत आहेत.