बेस्टचा संप तूर्तास टळला; प्रशासन नवीन वेतनश्रेणी करार करण्याबाबत सकारात्मक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 20:41 IST2019-08-24T20:27:33+5:302019-08-24T20:41:09+5:30
बेस्ट उपक्रमातील ९८ टक्के कामगारांनी संपाच्या बाजुने कौल दिला आहे. परंतु, प्रशासनाने नवीन वेतनश्रेणी करार करण्याची तयारी दाखविली आहे.

बेस्टचा संप तूर्तास टळला; प्रशासन नवीन वेतनश्रेणी करार करण्याबाबत सकारात्मक
मुंबई: बेस्ट उपक्रमातील ९८ टक्के कामगारांनी संपाच्या बाजुने कौल दिला आहे. परंतु, प्रशासनाने नवीन वेतनश्रेणी करार करण्याची तयारी दाखविली आहे. यासाठी कामगार संघटनांबरोबर वाटाघाटी होणार असल्याने बेस्ट कृती समितीने तूर्तास संपाचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. मात्र २६ऑगस्ट रोजी वडाळा बस आगारामध्ये कामगार धरणं आंदोलन करणार आहेत.
प्रलंबित वेतनकरार, बेस्ट अर्थसंकल्पाचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण, दिवाळी बोनस अशा विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी संपाची हाक दिली आहे. मात्र यापूर्वी दोनवेळा संपाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. या संपाला शिवसेना व काही कामगार संघटनांचा विरोध असल्याने शुक्रवारी सर्व बस आगारांमध्ये मतदान घेण्यात आले. या मतांची मोजणी शनिवारी सकाळी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये करण्यात आली.
या मतमोजणीत ९८ टक्के कामगारांनी संपाच्या बाजुने कौल दिला असल्याचे बेस्ट कामगार कृती समितीने जाहीर केले. मात्र बेस्ट प्रशासन आणि शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेमध्ये झालेल्या चर्चेनुसार २७ ऑगस्टपर्यंत वेतनकरार करणार असल्याचे जाहीर केले आहे. वाटाघाटी सुरु असल्याने संप करुन त्यात अडथळा आणू नये, असे संघटनेचे मत असल्याने संपाबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले.
कामगारांच्या मागण्या
सातवा वेतन आयोग लागू करणे, बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण, दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान.
९८ टक्के संपाच्या बाजुने
बेस्ट उपक्रमातील १७ हजार ९२५ कामगारांनी मतदान केले. यापैकी १७ हजार ४९७ कामगारांनी संप करावा असे मत दिले आहे. तर ३६८ कामगारांना संप मान्य नाही. तसेच ६० मतं अवैध ठरली आहेत. १७३१ कामगारांनी आॅनलाइन मतदान केले. यापैकी १५८६ कामगारांनी संपाला कौल दिला आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या नऊ दिवसांच्या संपाच्यावेळी १५ हजार २२१ कामगारांनी मतदान केले होते, त्यात १४ हजार ४६१ कामगारांनी संपाच्या बाजुने कौल दिला होता.