पूर्व उपनगरातील प्रवाशांना बेस्टचा ‘गारेगार’ प्रवास, तीन मार्गांवर साध्याऐवजी ‘एसी’ बसची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 11:26 IST2025-03-30T11:26:00+5:302025-03-30T11:26:17+5:30
BEST News : बेस्ट उपक्रमाने २७ मार्चपासून पूर्व उपनगरातील ‘७ मर्यादित’, ‘५११ मर्यादित’ व ‘सी ५३’ या तीन बस मार्गांचे वातानुकूलित बस मार्गात रूपांतर केले आहे. त्यामुळे या मार्गांवर गारेगार प्रवास अनुभवायला मिळणार आहे.

पूर्व उपनगरातील प्रवाशांना बेस्टचा ‘गारेगार’ प्रवास, तीन मार्गांवर साध्याऐवजी ‘एसी’ बसची सुविधा
मुंबई : बेस्ट उपक्रमाने २७ मार्चपासून पूर्व उपनगरातील ‘७ मर्यादित’, ‘५११ मर्यादित’ व ‘सी ५३’ या तीन बस मार्गांचे वातानुकूलित बस मार्गात रूपांतर केले आहे. त्यामुळे या मार्गांवर गारेगार प्रवास अनुभवायला मिळणार आहे.
‘बेस्ट’च्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बसचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्यात येत आहे. सध्या ‘ओलेक्ट्रा’ कंपनीच्या वातानुकूलित बस ताफ्यात येत असल्याने सध्याचे सर्वसाधारण बसमार्ग वातानुकूलितमध्ये रूपांतर करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पूर्व उपनगरातील तीन मार्गांचे रूपांतर वातानुकूलित बस मार्गामध्ये केले आहे. नवीन मार्गामध्ये ‘७ मर्यादित’ आता ‘ए ७’ या क्रमांकाने विजय वल्लभ चौक (पायधुनी) ते विक्रोळी आगारदरम्यान धावणार आहे. तर, ‘५११ मर्यादित’ ही बस आता ‘ए ५११’ अशी घाटकोपर आगार ते नेरूळ बस स्थानकादरम्यान धावेल. घाटकोपर आगार ते कळंबोलीदरम्यान धावणारी ‘सी ५३’ बस आता ‘ए सी ५३’ या क्रमांकाने धावेल. त्यामुळे पूर्व उपनगरातील प्रवाशांना उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे.
...या मार्गांवर जादा बस
‘ए ७’ व ‘ए ५११’ या बसमार्गांवर प्रत्येकी आठ बस गाड्या धावणार असून, ‘सी ५३’ या बसमार्गावर १४ बसगाड्या धावतील.