लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: शहरातील मेट्रो सेवेला समांतर बससेवा देण्यासाठी ५०० मिडी बस खरेदी करण्यास बेस्ट समितीने मंगळवारी मंजुरी दिली. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. शहर आणि उपनगरातील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडीतील मार्गावर प्रवाशांना सेवा देता यावी, यासाठी काही वर्षांपूर्वी बेस्ट प्रशासनाने मिडी बस ताफ्यात समाविष्ट केल्या. विक्रोळी, भांडुप, पवई येथील टेकडीवरील परिसरात मिडी बस चालवण्यात येत होत्या. मात्र, कालांतराने त्या बस कालबाह्य झाल्याने तेथील सेवा बंद करण्यात आली. परिणामी तेथील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात मिडी बस चालविण्याची गरज असल्याचे मत ‘बेस्ट’च्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
दुसरीकडे मुंबईत चार ते पाच मेट्रो मार्गिकाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना लास्ट माइल कनेक्टिव्हिटी पुरविणे आवश्यक आहे. त्याकरिता सक्षम बससेवेचे जाळे विणणे आवश्यक आहे. मात्र, मिडी बस नसल्याने मेट्रो, रेल्वे स्थानक परिसरात हवी तशी सेवा देता येत नाही. त्यामुळे मिडी बस खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने मंगळवारी बेस्ट समितीपुढे ठेवला असता सदस्यांनी त्याला मंजुरी दिली. आता तो पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाईल.
सध्या ताफ्यात २४९, ‘तेजस्विनी’च्या ३७ बस
- मेट्रो, रेल्वेस्थानक परिसरात केलेल्या अभ्यासात ३१५ मिडी बसची गरज असल्याची माहिती उपक्रमाने दिली. हा अभ्यास अहवाल मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात आला.
- सध्या बेस्ट उपक्रमात २४९ स्वत:च्या बस असून, यात ३७ बस महिलांसाठीच्या तेजस्विनी मिडी बस आहेत. तर, भाडेतत्त्वावरील ६२५ मिडी बस आहेत. पूर्वी मिडी बसचा २०० गाड्यांचा प्रस्ताव होता.
- हा प्रस्ताव विविध कारणांनी पुढे सरकलाच नाही. मात्र रेल्वे स्थानक, मेट्रो, टेकडीवरील परिसरातील बसची मागणी पाहता २०० मिडी बसचा प्रस्ताव सुधारित करून ५०० मिडी बस घेण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे.
‘स्वत:च्या मालकीच्या बस खरेदी करा’
- बेस्ट समितीमधील सर्व सदस्यांनी मिडी बस घेण्याचा निर्णय झालाच, तर त्या सर्व वातानुकूलित आणि त्या स्वत:च्या असाव्यात, अशी सूचना केली.
- या बस स्वत:च्या मालकीच्या घ्यावात की भाडेतत्त्वावर, यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवू आणि त्याला अनुदान मिळविण्याचाही प्रयत्न करू, अशी माहिती यावेळी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली.
- भाडेतत्त्वावरील बसचे होणारे अपघात, तांत्रिक बिघाड पाहता बस स्वत:च्या मालकीच्या असाव्यात यावर सदस्यांनी जोर दिला आणि याचा प्रस्ताव पुढील बैठकीत अंतिम करू, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी प्रशासनाला दिले.
‘महसूल वाढीसाठी लवकरच धोरण’
पालिकेचे अनुदान तसेच तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता बेस्टने स्वतः उत्पन्नाच्या इतर स्रोतांचा विकास करून महसूल वाढीचा प्रयत्न करायला हवा, असा सूर समिती सदस्यांनी आळवला. त्यावर बेस्ट उपक्रमाकडून याबाबतचे धोरण अंतिम करण्यात येत असून, ते सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती महाव्यवस्थापक सेठी यांनी दिली.
Web Summary : BEST committee approved purchasing 500 midi buses for better connectivity, especially near metro stations. The proposal awaits state government approval, aiming to improve last-mile services and replace aging buses. Focus is on owning, not renting, buses.
Web Summary : बेस्ट समिति ने बेहतर कनेक्टिविटी के लिए 500 मिडी बसें खरीदने को मंजूरी दी, खासकर मेट्रो स्टेशनों के पास। प्रस्ताव राज्य सरकार की मंजूरी का इंतजार कर रहा है, जिसका उद्देश्य अंतिम-मील सेवाओं में सुधार और पुरानी बसों को बदलना है। ध्यान किराए पर नहीं, बल्कि बसें खरीदने पर है।