लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २०२५ -२०३० या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक सोमवारी, १८ ऑगस्टला होणार आहे. तर मत मोजणी मंगळवार, १९ तारखेला होणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून ५ संघटनांचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात आहे.
चार वर्षांपासून रखडलेली बेस्ट पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळाले, तर महापालिका निवडणुकीत त्यांना लाभ मिळविता येईल. बेस्टच्या निवडणुकीत २१पैकी उद्धवसेना १९, तर मनसे २ जागा लढवणार आहे. त्यातच बेस्टच्या माझगाव येथील कर्मचारी बबिता पवार यांनी शिंदेसेनेतून ठाकरे बंधूंच्या पॅनलमध्ये प्रवेश केला.
कोणती संघटना कुठे?
उद्धवसेना व मनसे यांचे ‘उत्कर्ष पॅनल’ रिंगणात आहे. महायुतीकडून भाजप आ. प्रवीण दरेकर व आ. प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची ‘समर्थ बेस्ट कामगार संघटना’ आणि शिंदेसेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची ‘राष्ट्रीय कर्मचारी सेना’ एकत्र आल्या आहेत. त्यांनी ‘सहकार समृद्धी पॅनल’ची निर्मिती केली आहे.