बेस्टचे किमान बसभाडे आता किमान 5 रुपये, उद्यापासून होणार नवे दर लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 21:06 IST2019-07-08T21:05:57+5:302019-07-08T21:06:19+5:30
मुंबईतील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेच्या किमान प्रवासी भाड्यात मोठी कपात करण्यात आली आहे.

बेस्टचे किमान बसभाडे आता किमान 5 रुपये, उद्यापासून होणार नवे दर लागू
मुंबई - मुंबईतील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेच्या किमान प्रवासी भाड्यात मोठी कपात करण्यात आली आहे. बेस्टच्या किमान भाडेकपातीला महापालिकेची महासभा आणि आरटीएने मान्यता दिल्यानंतर आज राज्य सराकनेही भाडेकपातीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता बेस्टचे किमान बसभाडे हे 8 रुपयांवरून 5 रुपयांपर्यंत कमी होणार आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, बेस्टचे नवे दर मंगळवारपासून लागू होणार आहेत.
बेस्टची किमान बसभाडे आठ रुपयांवरून पाच रुपये करण्याचा निर्णय बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. याबाबतच्या प्रस्तावाला जून महिन्यात महापालिकेच्या महासभेत अंतिम मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानेही (आरटीए) बेस्ट उपक्रमाच्या भाडेकपातीला मंजुरी दिली होती. अखेर आज भाडेकपातीच्या प्रस्तावाला राज्यशासनाने मान्यता दिली आहे.
बेस्टला महापालिकेने सहाशे कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. शंभर कोटी अनुदान देताना पालिकेने काही अटी बेस्टसमोर ठेवल्या. त्यानुसार भाडेकरारावर ५३० बस घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बस भाड्यात कपात करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीपुढे मांडला होता. सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर बसभाडे कपातीचा प्रस्ताव एकमताने बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव पालिका महासभेपुढे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. यासाठी २७ जून रोजी तातडीची महासभा बोलाविण्यात आली होती.