मुंबई : सोमवारी बेस्ट ईलेक्ट्रिक हाऊस येथे पार पडलेल्या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांची बिनविरोध जाहीर निवड जाहीर करण्यात आली. महापौर रितू तावडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी केवळ तृष्णा विश्वासराव यांचा एकच वैध अर्ज दाखल झाल्याने तावडे यांनी त्यांची निवड बिनविरोध जाहीर केली.
बेस्ट समितीला चार वर्षांनी अध्यक्ष मिळाल्याने बेस्ट विद्युत पुरवठा व परिवहन या दोन्हींच्या समस्या व सक्षमीकरणावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेस्ट समिती अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर पार्किंग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण यावर तृष्णा विश्वासराव यांनी भाष्य केले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वे लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय एकमेकांशी जोडणे महत्त्वाचे आहे, त्यादृष्टीने उपाय बेस्ट उपक्रमाच्या समितीमार्फत केले जातील, अशी खात्री त्यांनी दिली. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष व बेस्ट समितीचे पदसिद्ध सदस्य प्रभाकर शिंदे, सर्व बेस्ट समिती सदस्य, तसेच बेस्टच्या महाव्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार) डॉ. अश्विनी जोशी उपस्थित होत्या.
पहिल्या महिला अध्यक्ष
बेस्टचा १९४७ पासूनचा इतिहास लक्षात घेता विश्वासराव या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. आतापर्यंत शरद आचार्य, नारायण राणे, विठ्ठल चव्हाण, गणपत कदम, अरविंद नेरकर, असे अनेक ज्येष्ठ नेते बेस्ट समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. नारायण राणे आमदार असतानाही बेस्ट समितीचे अध्यक्ष होते.
बेस्ट समितीवरील सदस्य
बेस्ट उपक्रमावर सुमारे तीन हजार कोटींची तूट आहे, तर संचित तूट सुमारे आठ हजार कोटींपर्यंत गेली आहे. त्यामुळे बेस्टच्या समिती अध्यक्षावर बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढणे, कामगारांचे प्रश्न सोडवणे, अशी मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
बेस्ट समितीवर भाजपकडून आकाश पुरोहित, सुनील गणाचार्य, संतोष मेढेकर, अजय सिंग, प्रमोद वाकोडे, रमाकांत गुप्ता यांना सदस्य म्हणून पाठवण्यात आले आहे. तर, शिंदेसेनेकडून सदस्य म्हणून उपेंद्र सावंत यांना संधी दिली आहे.
उद्धवसेनेकडून पक्षाचे प्रवीणा मोरजकर, सुनील आहिर, नितीन नांदगावकर, सचिन पाटील आणि काँग्रेसच्या आशा कोपरकर बेस्ट समितीवर आहेत.
सुधार समिती अध्यक्षपदी संध्या दोशी
मुंबई महापालिकेच्या सुधार समिती अध्यक्षपदी शिंदेंसेनेच्या संध्या दोशी यांची सोमवारी बिनविरोधी निवड झाली. सत्ता वाटपात या समितीचे अध्यक्षपद शिंदेसेनेकडे आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदासाठी दोशी यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले.
रुपयाच्या अवमूल्यनामुळे महापालिकेच्या मालमत्तांसाठी आकारण्यात येणारे भुईभाडे, हस्तांतरण अधिमुल्य नगण्य ठरते. ही आकारणी महागाई निर्देशांकाशी जोडून निर्देशांकामध्ये जशी वाढविली होईल, तशी यात वाढ केल्यास पालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. तशा उपाययोजनाचा करण्याचे आश्वासन, दोशी यांनी भाषणात दिले.
विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अंतर्गत पालिकेच्या मालमत्तांचा पुनर्विकास करण्यात येतो; परंतु विकासकाकडून जास्त लाभ मिळावा, या उद्देशाने वारंवार विकासक बदलले जातात. त्याकरिता ठोस धोरण तयार करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
Web Summary : Trishna Viswasrao elected unopposed as BEST committee president after four years, becoming the first woman to hold the position. She focuses on improving public transport and addressing BEST's financial challenges. Sandhya Doshi elected as head of Improvements Committee.
Web Summary : तृष्णा विश्वासराव चार साल बाद बेस्ट समिति की निर्विरोध अध्यक्ष चुनी गईं, यह पद संभालने वाली पहली महिला हैं। सार्वजनिक परिवहन को बेहतर बनाने और बेस्ट की वित्तीय चुनौतियों का समाधान करने पर उनका ध्यान केंद्रित है। संध्या दोशी सुधार समिति की प्रमुख चुनी गईं।