Best buses will be run at full capacity state government gives permission to best authority | ठाकरे सरकारनं घेतले दोन महत्त्वाचे निर्णय; मुंबईकरांना मोठा दिलासा

ठाकरे सरकारनं घेतले दोन महत्त्वाचे निर्णय; मुंबईकरांना मोठा दिलासा

मुंबई: अद्याप लोकल प्रवासाची मुभा देण्यात न आल्यानं प्रवास करताना सर्वसामान्य मुंबईकरांचे अतिशय हाल होत आहेत. याचा ताण बेस्ट सेवेवर पडत आहे. त्यातच फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेनं चालवल्या जात नाहीत. मात्र आता बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेनं चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसं पत्र राज्य सरकारनं बेस्ट प्रशासनाला दिलं आहे. त्यामुळे लवकरच बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहेत.

लोकल सर्वांसाठी केव्हा सुरू होणार? ठाकरे सरकारकडून महत्त्वाचे संकेत

बेस्टमधून पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू करण्यासोबतच जीम खुल्या करण्याचा निर्णयदेखील राज्य सरकारनं घेतला आहे. २५ ऑक्टोबरपासून राज्यातल्या जीम सुरू होतील. त्यामुळे जीम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमधील जीम बंदच राहतील. राज्य सरकारनं घेतलेले हे दोन निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचेही संकेत
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याचा निर्णय पुढील २-३ दिवस घेण्यात येईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून लवकरच लोकल प्रवासाबद्दल निर्णय घेतला जाईल, असं ते पुढे म्हणाले. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विजय वडेट्टीवारांनी काल राज्य सरकारमधील अधिकारी आणि रेल्वे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर बोलताना वडेट्टीवारांनी लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरू होईल, असे संकेत दिले. 'मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी फार वाट पाहावी लागणार नाही. लवकरच याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल. सर्व संबंधित विभागांना आणि संस्थांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल,' असं वडेट्टीवार म्हणाले.

रेल्वे दुर्गांनी आणली ‘जीवनवाहिनी’त जान, महिला प्रवाशांची लगबग वाढली 

गेल्या मंगळवारपर्यंत (२० ऑक्टोबर) केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र बुधवारपासून (२१ ऑक्टोबर) महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मध्य आणि पश्चिम मार्गांवर महिलांना प्रवास करण्याची मुभा दिली गेली. मात्र त्यासाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना प्रवास करता येऊ शकेल.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Best buses will be run at full capacity state government gives permission to best authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.