Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 09:17 IST2025-04-28T09:15:06+5:302025-04-28T09:17:13+5:30
Best Bus Ticket Price Hike: बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. बेस्ट बस तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
Best Bus Ticket Fare:मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च वाढवणारा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. स्वस्तात बेस्टच्या एसी आणि साध्या बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. बेस्ट बसच्या तिकीत दरात वाढ करण्याच्या निर्णयाला मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बेस्ट बस भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई महापालिका बेस्ट बसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवते. बेस्ट बसचे तिकीट दर किमान ५ रुपये असल्याने यामुळे बेस्टच्या महसूलात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे दिला होता.
सात वर्षांपूर्वी करण्यात आली होती भाडेवाढ
बेस्टने सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये तिकीट दरात वाढ केली होती. साध्या बसचे किमान भाडे ८ रुपये, तर वातानुकूलित बसचे किमान भाडे २० रुपये करण्यात आले होते.
२०१९ मध्ये हा निर्णय बदलण्यात आला. तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टच्या भाड्यात कपात केली होती. साध्या बसचे किमान भाडे ५ रुपये, तर वातानुकूलित बसचे किमान भाडे ६ रुपये करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निर्णय
तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा मुद्दा मांडला होता.
बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर करून महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. वाहतूक विभाग आणि नगरविकास खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर नवीन तिकीट दर लागू होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बेस्ट बस भाडेवाढ : साध्या बसच्या तिकिटाच्या दरात किती वाढ होणार?
५ किमी अंतरासाठी ५ रुपये तिकीट आहे, ते १० रुपये केले जाणार आहे.
१० किमी अंतरासाठी १० रुपयांऐवजी १५ रुपये मोजावे लागणार आहे.
१५ किमी अंतरासाठी २० रुपये, तर २० किमी अंतरासाठी ३० रुपये तिकीट दर असणार आहेत.
वातानुकूलित बसच्या तिकिट दरात किती वाढ होणार?
सध्या ५ किमी अंतरासाठी ६ रुपये तिकीट आहे. त्यात वाढ झाल्यानंतर १२ रुपये होईल.
याच प्रमाणे १० किमी अंतरासाठी १३ रुपयांऐवजी २० रुपये, तर १५ किमी अंतरासाठी १९ रुपयांऐवजी आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत. २० किमी अंतरासाठी ३५ रुपये तिकीट आकारले जाणार आहे.
बेस्ट बसचा मासिक पासही महागला
५ किमी अंतरासाठी सध्या ४५० रुपयांचा पास मिळतो. भाडेवाढीनंतर हा पास ८०० रुपयांना मिळेल.
१० किमी अंतरासाठीचा पास भाडेवाढीनंतर १००० रुपयांवरून १२५० रुपये इतका होईल. तर १५ किमी अंतरासाठीचा पास १६५० रुपयांऐवजी १७०० रुपयांना मिळेल. २० किमी अंतरासाठीचा पासही २६०० रुपयांना मिळेल.
वातानुकूलित बसच्या पासमध्ये किती वाढ होणार?
५ किमी अंतराच्या पाससाठी सध्या ६०० रुपये मोजावे लागतात. पण, भाडेवाढीनंतर ११०० रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचपाठोपाठ १० किमी अंतरासाठीचा पास १४०० रुपयांऐवजी १७०० रुपयांना मिळेल. त्याचबरोबर १५ किमीचा पास २१०० ऐवजी २३००, तर २० किमीसाठीचा पास २७०० रुपयांऐवजी ३५०० रुपयांना मिळेल.