मुंबई :
कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस दुर्घटनेनंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून बुधवारीही बेस्टची सेवा बंद होती. मात्र, याचा फटका कुर्ला रेल्वे स्थानकातून वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), अंधेरी आणि सांताक्रुझ येथे ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला. कुर्ला रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या सर्वच बेस्ट बस कुर्ला डेपोपर्यंत चालविल्या जात असल्याने प्रवाशांना कुर्ला डेपोपासून रेल्वे स्थानकापर्यंत पायपीट करावी लागत होती. तर, रिक्षाचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
कुर्ला बेस्ट बस स्थानकातून अंधेरी, सांताक्रुझ, बीकेसी, पवई या ठिकाणी बस धावतात. गेल्या दोन दिवसांपासून बेस्ट बस स्थानकाव्यतिरिक्त कुर्ला डेपोतून बस सोडल्या जात आहेत. तसेच, येणाऱ्या बसही डेपोपर्यंत येत आहे. त्यामुळे कुर्ला डेपो, कलिना, एमटीएनएल, म्हाडासह कल्पना सिनेमा, शीतल सिनेमा, बैलबाजार, जरीमरीसह साकीनाक्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
कशी झाली लूट?मीटर रिक्षाकुर्ला ते अंधेरी ३०० रुपये कुर्ला ते बीकेसी १३० रुपये
शेअर रिक्षा (भाडे प्रति प्रवासी) कुर्ला ते बीकेसी ५० रुपयेकुर्ला ते म्हाडा ऑफीस ५० रुपये
रिक्षाचालकांची मनमानी बेस्ट सेवा बंद असल्याने कुर्ल्यातील बेस्ट बस स्थानकाचा परिसर मोकळा होता. मात्र, मीटर आणि शेअर रिक्षावाले कुणालाच जुमानत नव्हते.
बेस्ट बसच्या मार्गातील बदलबेस्टच्या ३७, ३२०, ३१९, ३२५, ३३०, ३६५ आणि ४४६ क्रमांकाच्या बस कुर्ला आगारातून चालविल्या गेल्या. तसेच, सांताक्रुझ ते कुर्ला स्टेशनदरम्यान धावणाऱ्या ३११, ३१३ आणि ३१८ या बस कुर्ला स्टेशनकडे न जाता टिळक नगर येथपर्यंतच चालविल्या गेल्या. ३१० बस टिळक नगर पूल येथे यु वळण घेऊन वांद्रे बस स्थानकापर्यंत चालिवली गेली.
विद्याविहार, घाटकोपरहून प्रवासकुर्ल्यातील बस बंद असल्याने प्रवासी विद्याविहार, घाटकोपरला उतरून बसने प्रवास करत होते. बससोबत शेअर व मीटर रिक्षाकरिता मोठी गर्दी असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
शेअर रिक्षाला प्राधान्य बीकेसीकडे जाणारे अनेक प्रवासी कुर्ला डेपोपर्यंतचा प्रवास पायी करत होते. तर, काही प्रवासी शेअर रिक्षाला प्राधान्य देत होते. मात्र, भाडे जास्त असल्याने त्यांनीही कार्यालयीन अंतर पायी कापले.