सर्व आरोग्य योजनांचा एकाच ठिकाणी लाभ; पालिका रुग्णालयात नि:शुल्क वैद्यकीय सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:11 IST2025-10-04T13:11:03+5:302025-10-04T13:11:40+5:30
शासनाच्या योजनांद्वारे अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा नि:शुल्क देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत.

सर्व आरोग्य योजनांचा एकाच ठिकाणी लाभ; पालिका रुग्णालयात नि:शुल्क वैद्यकीय सेवा
मुंबई : शासनाच्या योजनांद्वारे अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा नि:शुल्क देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याकरिता इंटिग्रेटेड पेशंट्स हेल्थकेअर स्किम असिस्टन्स प्रणालीच्या माध्यमातून पालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्यांना निःशुल्क सेवा देण्यात येणार आहे. या प्रणालीशी संबंधित निविदा प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्याची कार्यवाही सध्या प्रगतिपथावर आहे.
पालिकेच्या प्रमुख, उपनगरीय रुग्णालयांसह सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील रुग्णालये व दवाखान्यांच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतात. सद्यस्थितीत प्रामुख्याने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या योजनांचा लाभ पालिकेच्या रुग्णालयांत घेता येतो. केंद्र शासनाच्या, आयुषमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, राष्ट्रीय आरोग्य निधी, हेल्थ मिनिस्टर डिस्क्रिनिशरी ग्रँट, कामगार कर्मचारी विमा योजना, राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अशा प्रकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी नवीन प्रणालीच्या माध्यमातून रुग्णालय प्रशासनाला आणि रुग्णांमध्ये मदत, समन्वयाचे काम करण्यात येईल.
उपचार खर्चाची कमाल मर्यादा वाढणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या योजनेंतर्गत आरोग्य सेवेशी संबंधित उपचार खर्चाची कमाल मर्यादा वाढवण्याची आणि अतिरिक्त आरोग्य सेवा पॅकेजचा अंतर्भाव करण्याची घोषणा केली आहे. पालिकेच्या रुग्णालयातही या प्रणालीच्या माध्यमातून देण्यात येणारी सेवा राज्य सरकारच्या धोरणाशी सुसंगत असल्यामुळे रुग्णांना भविष्यात याचा फायदा होईल.
खर्च कमी करण्याचे ध्येय
अधिकाधिक रुग्णांना निःशुल्क पद्धतीने आरोग्य उपचार होतील, रुग्णांचा आरोग्य सेवेसाठी होणारा खर्च कमी करणे हेदेखील प्रणाली वापराचे उद्दिष्ट आहे.