Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विशेषाधिकाराबाबत विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 22:30 IST

जितेंद्र आव्हाड हे विधानसभेचे सन्मानीय सदस्य आहेत, त्यांना नियम माहित आहेत

मुंबई  - जितेंद्र आव्हाडांवर दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला आहे. यावरुन आता चांगलंच राजकारण रंगलं आहे. आव्हाडांनी राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे द्यायला हवा, असे भाजपकडून म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनीही राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे दिला जातो असे म्हणत भूमिका स्पष्ट केली. तसेच, अद्याप कुठल्याही सदस्याचा राजीनामा आपल्याकडे आला नसल्याचंही ते म्हणाले, तसेच, आमदारांचे विशेषाधिकार अबाधित ठेवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

जितेंद्र आव्हाड हे विधानसभेचे सन्मानीय सदस्य आहेत, त्यांना नियम माहित आहेत. राजीनामा स्वीकारण्यापूर्वी पडताळणी होईल आणि मगच तो स्वीकारला जाईल. याप्रकरणी, तपास सुरू असून निर्दोष व्यक्तींवर करवाई केली जाणार नाही. विधीमंडळ सदस्यांबद्दल जी कारवाई करायची असते, त्यापूर्वी विधानसभा कार्यालयाला कळवावे लागते. आव्हाड यांच्यासंदर्भातील कारावाईबाबतही विधानसभा कार्यालयास आणि मला कळविण्यात आले आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, किंवा विशेषाधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी ही सभागृहाची आणि अध्यक्षांची आहे, ती आम्ही निश्चितपणे पार पाडू, असेही त्यांनी म्हटले. जर कोणाला राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी सर्व योग्य प्रोसीजर करायला हवी. कायदा सर्वांसाठी समान आहे, आम्ही त्याचं योग्य पालन करू आणि निर्णय घेऊ. मात्र, जितेंद्र आव्हाड किंवा कोणत्याही सदस्याचा अद्याप राजीनामा आमच्याकडे आलेला नाही, असेही नार्वेकर यांनी सांगितले.

अजित पवारांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

पोलीस दबावाखाली वागत आहेत. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम केले आहे. १९९९ ते २०१४ लागोपाठ आम्ही पंधरा वर्षे सरकारमध्ये होतो. भुजबळ, आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या तिघांकडे गृहमंत्री पद होते. साडेसतरा वर्षे गृहखाते राष्ट्रवादीकडे होते मात्र या खात्याचा गैरवापर होता कामा नये याची खबरदारी घेण्यात आली होती. त्यावेळी आदरयुक्त दरारा होता. अशाप्रकारचा अन्याय कुणावर होत नव्हता ही वस्तुस्थिती होती. जर यदाकदाचित कुणी प्रयत्न केला तर ज्याची चूक असेल त्याला तिथल्या तिथे खडसावले जात होते, असं सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

काय म्हणाले जयंत पाटील

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा माझ्याकडे दिला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मी त्यांनी हा राजीनामा मागे घ्यावा, राजीनामा देऊ नये, अशी भूमिका घेतली. मात्र, त्यांनी माझ्याकडे हा राजीनामा दिला असून आता आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मी राजानामा पत्र घेऊन जाईल, मी शरद पवार यांच्याशी चर्चा करेल आणि त्यावर तेच निर्णय घेतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आशिष शेलांरांचा पक्ष येथे उभा राहिल्यानंतर, प्रचार न करताच जितेंद्र आव्हाड निवडून येतील, असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही कायदेशीर लढाई लढू, असे सांगत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली. 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

"पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही कलम ३५४, मी या पोलीसी अत्याचाराविरुद्ध लढणार...मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या...उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत", असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे

टॅग्स :जितेंद्र आव्हाडराहुल नार्वेकरविधानसभा